सोनेवाडी-रायपूर शिवारात पुराचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान….
चिखली (एकनाथ माळेकर)तालुक्यातील सोनेवाडी रायपूर शिवारात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राम नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी नदीलगतच्या शेतात घुसल्याने परिसरात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य दिसत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे.नदीने धोकादायक रुप धारण केल्याने शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. केवळ पिकांचे नुकसानच झालेले नाही तर विहिरींमध्येही पाणी आणि गाळ साचल्यामुळे मोटार पंप, पाईप, केबल आदी शेतीसाठी आवश्यक साधनांचे नुकसान झाले आहे. तसेच पाण्याच्या अतिप्रवाहामुळे जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.
सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने शेतकरी संकटात सापडले असून सरकारकडून त्वरित मदत मिळावी, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
