बुलढाणा जिल्हा लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर बैलपोळा साजरा करण्यास मार्गदर्शक सूचना….
बुलढाणा (एकनाथ माळेकर) जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बैलपोळा सण यंदा साधेपणाने आणि सुरक्षिततेच्या उपायांसह साजरा करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिकांनी बैलपोळा घरच्या घरी, कमीत कमी जनावरे एकत्र न आणता साजरा करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जनावरे एकत्र आल्यास लंपी रोगाचा फैलाव होण्याचा धोका अधिक असल्याने, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने दक्षता घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पशुसंवर्धन विभाग आणि ग्राम प्रशासन यांच्यामार्फत जनजागृती मोहिमेसही सुरूवात झाली आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपली जनावरे सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
