सोन्याचे आमिष दाखवून अमडापूर परिसरात १० लाखांचा दरोडा पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपी केले जेरबंद
चिखली (निलेश कोल्हे) चिखली तालुक्यातील अमडापूर, पोलिस स्टेशन हद्दीतील इसोली पासून काही अंतरावर असलेल्या सावरखेड बुद्रुक रस्त्यावर ५ ते ७ जणांनी शस्त्राचा धाक दाखवत व मारझोड करत चंद्रपूर येथील २ नागरिकांना १० लाख ४६ हजार रुपयांनी लुटल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली पण अमडापूर पोलिसांनी वेगाने चौफेर तपास करून १२ तासाच्या आत आरोपींना जेरबंद केले.प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथील राजेश नगराळे व त्यांचे मित्र नागेश मडावी यांना जानेफळ येथील त्यांच्या संपर्कातील अजय नावाच्या व्यक्तीने आमच्या शेतामध्ये सोन्याच्या गिन्या सापडल्या असून, त्या आम्हाला विकायचे आहेत, अशी फोन द्वारे माहिती दिली. त्या सोन्याच्या गिन्या पाहण्यासाठी चंद्रपूर येथील
दोघेही १५ ऑगस्ट रोजी जानेफळ येथे आले असता त्यांना अजय व त्याच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींनी सोन्याच्या गिन्या दाखवल्या.
दाखवलेल्या २ दागिन्या या असल्याची खात्री पटल्यानंतर त्या खरेदी करण्याची तयारी राजेश व नागेश यांनी दाखवली. अशा ३ किलो ३०० ग्राम सोन्याच्या गिन्या असल्याची माहिती जानेफळ येथील अजय याने चंद्रपूर येथील उपरोक्त दोघांना दिली. चंद्रपूर येथील राजेश नगराळे व नागेश मडावी हे १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता १० लाख रुपये घेऊन सोन्याच्या गिन्या खरेदी करण्यासाठी जानेफळ येथे आले असता अजय याने त्यांना आम्ही रोडवर गिन्या घेऊन उभे आहोत, असे सांगून ईसोलीकडे बोलावले.
त्या ठिकाणी अजय व आणखी एक व्यक्ती दुचाकी घेऊन उभे होते. अजय हा चंद्रपूर येथील नागरिकांच्या गाडीत बसला व गाडी सावरखेड बुद्रुक गावाकडे घेण्यास सांगितले. थोड्या अंतरावर गेल्यावर गाडी थांबवली असता त्या ठिकाणी एक व्यक्ती उभी होती. त्याच्याजवळ असलेले सोने हे नकली असल्याचे कळाल्यामुळे राजेश नगराळे व नागेश मडावी यांनी आम्हाला सोने नको, असे ५ ते ७ लोकांनी कोयता व अन्य धारदार शस्त्रांनी त्या दोघांवरही हल्ला केला. गाडीमध्ये ठेवलेल्या बॅगेतील १० लाख रुपये तसेच राजेश व नागेश जवळ असलेले दोन मोबाईल, नागेश मडावी यांच्या हातातील कॅसिनो कंपनीची घड्याळ, नगदी ८००० रुपये असे १० लाख ४६ हजार रुपयांची लूट करून आरोपी फरार झाले. दरोड्याची माहिती कळताच ठाणेदार निखिल निर्मल हे तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व लगेच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. अतिशय मर्यादित कुमक सोबत घेऊन तक्रार दाखल झाल्याच्या १२ तासाच्या आत या दरोड्यातील ३ आरोपींना जेरबंद केल्याने सर्वत्र ठाणेदार निर्मल यांचे कौतुक होत आहे.अटक करण्यात आलेले आरोपी ईनेश सुभाष पवार, सुभाष रोहिदास पवार दोघेही रा. दधम ता. खामगाव व उमेश छगन शिंदे रा.धानोरी ता. चिखली यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शनिवार २३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोघ गायकवाड, सुधीर पाटील, पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात निखिल निर्मळ, भगवान शेवाळे, चंद्रशेखर मुरडकर, प्रदीप चोपडे, शिवाजी बिलगे, अच्युतराव सिरसाठ यांनी केली.
