चिखली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या! – गजानन वायाळ यांची प्रशासनाला मागणी!

IMG-20250721-WA0031

चिखली (एकनाथ माळेकर)
चिखली तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून विहिरींच्या काठावरून पाणी ओसंडून जात आहे. शेतात पाणी साचल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक फळबागाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

या भीषण परिस्थितीतही प्रशासन फक्त तीन मंडळांना ‘अतिवृष्टीग्रस्त’ घोषित करत आहे. उर्वरित मंडळांमध्ये झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान प्रशासनाच्या निकषात बसत नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांना मदत नाकारली जात आहे. मात्र, खरीप हंगामातील गंभीर नुकसान पाहता संपूर्ण चिखली तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन संतोषराव वायाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.वायाळ यांनी पुढे सांगितले की, सततच्या पावसामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी खरीप पिके पूर्णपणे पाण्यात बुडून गेली आहेत.पपई,द्राक्ष, डाळिंब, केळी यांसारख्या फळबागा उखडून पडल्या असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.गावागावात शेतकऱ्यांच्या शिवारात पाणीच पाणी दिसत आहे.

अशा संकटाच्या वेळी निकष न पाहता शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक विमा, कर्जमाफी आणि तत्काळ दिलासा मिळावा, ही वेळेची गरज आहे. अन्यथा शेतकरी आणखी मोठ्या संकटात सापडतील, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

गजानन वायाळ यांच्या या मागणीला चिखली तालुक्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत असून शेतकरी प्रशासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.

You may have missed

error: Content is protected !!