किनगाव राजामध्ये अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन कारवाया,दोन टिप्पर, स्विफ्ट डिझायर गाडी जप्त; चार आरोपींविरुद्ध गुन्हे….
सिंदखेडराजा( अनिल दराडे )किनगाव राजा परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई केली. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मिळून दोन टिप्पर व एक स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून तब्बल १८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
पहिली कारवाई
५ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४० वाजता किनगाव राजा बस स्टँड–हिवरखेड–पूर्णा रोडवर पोलिसांनी एक टिप्पर (क्र. MH-28-BB-9048) जप्त केला. त्यामध्ये परवानगीशिवाय वाहतूक होत असलेली दोन ब्रास वाळू (किंमत सुमारे ६ हजार रुपये) आढळली. वाहनासह एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संतोष गबाजी भुमकर (३५) व भरत संजय राठोड (२३, दोघे रा. ताडशिवणी) यांच्याविरुद्ध अप क्र. २१८/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी कारवाई
याच दिवशी पहाटे ३.०० वाजता दुसरी कारवाई करण्यात आली. या वेळी दुसरा टिप्पर (क्र. MH-28-BB-6112) अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळला. यासोबतच पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर (क्र. MH-28-BQ-6749) देखील ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत १० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.
या प्रकरणी समाधान नारायण मोरे व सचिन नामदेव राठोड (२६, रा. ताडशिवणी) यांच्याविरुद्ध अप क्र. २१७/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांची माहिती
दोन्ही प्रकरणांत फिर्यादी म्हणून पोहेका विश्वास काकड यांनी तक्रार दाखल केली. तपास पोहेका अनिल नागरे यांच्या स्वाधीन आहे. ही कारवाई जी.पी.एस.आय. शरद ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस स्टेशन किनगाव राजा येथील ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
निष्कर्ष
सलग दोन कारवायांमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धाक निर्माण केला आहे.
