शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा सर्वज्ञ अर्बन परिवाराकडून सत्कार
चिखली( निलेश कोल्हे) चिखली येथे ५ सप्टेंबर रोजी, डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.या शिक्षक दिनानिमित्त सर्वज्ञ महिला अर्बन चिखली परिवाराने चिखली तालुक्यातील ३०सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करून सामाजिक वारसा जपला आहे.
महानुभव पंथामध्ये चौथे अवतार म्हणून समजले जाणारे श्री गोविंद प्रभू यांचा जन्मदिवस आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्मदिवस असा दुग्ध शर्करा योग असलेला या वर्षीचा ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने सर्वज्ञ महिला अर्बन पतसंस्थेकडून चिखली तालुक्यातील विविध विद्यालयातून कर्तव्यनिष्ठेने अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम करून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा श्रीकृष्ण मंदिर चिखली येथे सत्कार करण्यात आला.या ठिकाणी गुलाब पुष्प आणि श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .यावेळी बोलताना त्रिवेदी सर यांनी शिक्षक हा समाजाप्रती वाहून घेतलेली व्यक्ती आहे आणि समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शेवटपर्यंत शिक्षण देणारा एकमेव व्यक्ती म्हणून शिक्षकाला या ठिकाणी ओळखले जाते भारत देशाचे भविष्य उज्वल करणाऱ्या अनेक पिढ्या घडवण्याचे काम शिक्षक हा करत असतो असे विचार या ठिकाणी त्रिवेदी सरांनी बोलताना व्यक्त केले. त्याच बरोबर उदयनगर येथील श्री मोहता सर यांनी सुद्धा गुरु आणि शिष्य यांच्यातील ऋणानुबंध कसे असावे यावर आपले विचार मांडले एकूणच या ठिकाणी तालुक्यातील विविध सेवानिवृत्त शिक्षक या समारंभासाठी हजर होते आणि त्यांनी या पतसंस्थेचे खूप भरभरून कौतुक केले संस्थेद्वारा चालवल्या जाणाऱ्या विविध योजना, राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमासाठी यावेळी श्रीकृष्ण मंदिर चिखली येथील श्री संवत्सर बाबा महानुभाव कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ वंदनाताई पुंडलिकराव सावळे व उपाध्यक्षा सौ किरणताई प्रकाशजी दिघेकर व कार्यकारी संचालिका सौ.सरलाताई किशोर भानुसे तसेच सर्व संचालक मंडळ , स्थानिक संचालक मंडळ, अनेक सभासद ,खातेदार , शाखा व्यवस्थापक व कर्मचारी वृंद यांची कार्यक्रमास उपस्थिती होती . अध्यक्षीय भाषणात श्री संवत्सर बाबा महानुभाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि महानुभव पंथामध्ये गुरु आणि शिष्य यांचे नाते कसे असते तसेच श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधर स्वामी यांनी समाजाला जी सदाचाराची शिकवण दिली याबद्दल थोडक्यात माहिती आपल्या प्रवचनातून दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मार्गदर्शक शेगांव येथील श्री पी एन कोल्हे सर यांनी केले तर सूत्रसंचालनाची धुरा संस्थेचे पालक मार्गदर्शक श्री वाघ सर यांनी सांभाळली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेवानिवृत्त प्राचार्य श्री समाधानजी शेळके यांनी उपस्थित सर्व सत्कारमूर्ती यांच्या वतीने केले .
