तुटपुंज्या रकमेवर शेतकर्‍यांची बोळवण; चिखली पीकविमा कार्यालयात शेतकरी आक्रमक!- क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्‍यांचा ठिय्या! सर्व्हे फॉर्म देण्यासह पीकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी ऐरणीवर!

IMG-20250910-WA0055

चिखली (निलेश कोल्हे) पीकविमा कंपनीने अगदी तुटपुंज्या पीकविमा नुकसान भरपाईवर शेतकर्‍यांची बोळवण केली असून, त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे. काही शेतकर्‍यांना फक्त शंभर रूपये नुकसान भरपाई तर त्याच गटात काही शेतकर्‍यांना लाखाची नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी सर्व्हे फॉर्मची मागणी केली आहे. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह संतप्त शेतकर्‍यांनी चिखली येथील पीकविमा कंपनीच्या कार्यालयावर आज (दि.१०) धडक दिली असून, कार्यालयात आक्रमक आंदोलन सुरू आहे. सरनाईक यांच्यासह शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला असून, घटनास्थळी पोलिसांनीदेखील धाव घेतली आहे. विशेष म्हणजे, पीकविमा कंपनीकडून अनेक शेतकर्‍यांना अक्षरशः १९, १४८, ६३, ३८६, २९० रूपये अशी तुटपुंजी रक्कम आली असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात भेदभाव केला जात असून, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांना तुटपुंजी पीकविमा रक्कम आली आहे. काही शेतकर्‍यांना २००, ३०० रूपये आले आहे. तर काहींना ६ एकराला १ लाख रुपये आले असल्याने हे नियम नेमके कसे? हेक्टरी किती रूपये रक्कम विमा मंजूर झाला? असा असा सवाल क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी उपस्थित करीत, शेतकर्‍यांना सर्व्हे फॉर्म उपलब्ध करुन द्या, आम्ही आमची लढाई लढू, असे पीकविमा कंपनीला ठणकावून सांगितले आहे. मात्र सातत्याने शेतकरी सर्व्हे फॉर्मची मागणी करायला गेल्यास त्यांना ते दिले जात नाही. पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकर्‍यांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. वास्तविक याची एक प्रत कृषी विभाग व पीकविमा कार्यालयात असणे आवश्यक असतांना सर्व्हे फॉर्म कंपनीला दिल्याचे सांगितले जाते. जो शेतकरी फॉर्म मागेल त्याला तो उपलब्ध करुन द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सरनाईक यांनी कालच दिला होता. त्यानंतर पीकविमा व सर्व्हे फॉर्मसह शेतकरीहिताच्या इतर मागण्यांसाठी सरनाईक व आक्रमक शेतकर्‍यांनी चिखली येथील पीकविमा कंपनीचा ताबा घेतला असून, आक्रमक आंदोलन सुरू केले आहे.
त्यामुळे कृषी, महसूल विभागासह पीकविमा कंपनीच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बंदोबस्त वाढविला आहे. या आंदोलनात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह विलास वसु,अमोल पाटील पडघान,विलास मुजमुले, प्रविण पाटील, दिलीपराव वायाळ,राजू कुटे, विजय पाटील, विलास तायडे, बंडू शेळके, संदीप गवई, पवन शेगोकार, भाऊराव गवई, परमेश्वर शेळके, नितीन शेळके, विलास तायडे, विष्णू मोरे, आत्माराम मोरे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित आहेत.

You may have missed

error: Content is protected !!