लोणार येथून सुटणाऱ्या बसफेऱ्यांना मेहकर मार्गफलक प्रवाशांमध्ये संभ्रम
लोणार (यासीन शेख)येथील बस स्थानकावरून सुटणाऱ्या तीन बसफेऱ्यांना मेहकरचे मार्गफलक लावण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे या बसफेऱ्यांना लोणार या नावाने मार्गफलक लावण्याची मागणी प्रवासी सेवा संघटनेने केली आहे.
मेहकर आगाराकडून लोणार बस स्थानकावरून लोणार-त्र्यंबकेश्वर, लोणार-पुणे आणि लोणार-जळगाव अशा तीन बसफेऱ्या सुरू आहेत. या बसफेऱ्यांना सुरुवातीपासून लोणार-त्र्यंबकेश्वर, लोणार-पुणे आणि लोणार-जळगाव या नावाने मार्गफलक लावण्यात येत होते. परंतु, एका वर्षापासून या बसफेऱ्यांना मेहकर-त्र्यंबकेश्वर, मेहकर-पुणे आणि मेहकर-जळगाव या नावाने मार्गफलक लावण्यात येत आहेत. त्यामुळे बसफेरी लोणारकडे जाणार की मेहकरकडे जाणार असा संभ्रम प्रवाशांमध्ये निर्माण होत आहे. आगाराच्या या दुर्लक्षित कारभारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सोबतच राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. लोणार बस स्थानकावरून सुटणाऱ्या या बसफेऱ्यांना लोणार या नावाने मार्गफलक लावण्याबाबत दि. ६ ऑगस्ट रोजी प्रवासी सेवा संघटनेने मेहकर आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते. निवेदनाची प्रत महाव्यवस्थापक (वाहतूक), प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांनाही देण्यात आली. मात्र, मेहकर आगाराकडून या मागणीची अद्यापपर्यंतही दखल घेण्यात आली नसल्याने प्रवाशांची प्रवासाची गैरसोय होत आहे. लोणार बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसफेऱ्यांना लोणार या नावाने मार्गफलक लावण्याची मागणी संघटनेने केल्याची माहिती प्रवासी संघटनेचे भागवत खरात यांनी दिली आहे.
