हॉटेल व व्यवसायिकांनी घरगुती गॅसचा गैरवापर थांबवा – तहसीलदार भूषण पाटील यांचा इशारा….
लोणार( यासीन शेख)महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायिक वापर थांबविण्यासाठी कडक पावले उचलण्याचा इशारा तहसीलदार भूषण पाटील यांनी दिला आहे.तहसील कार्यालय, लोणार (दि. १७ सप्टेंबर २०२५) यांच्याकडून काढलेल्या माहिती पत्रकानुसार, तालुक्यातील सर्व दवाखाने, हॉटेल व्यवसायिक तसेच अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानांनी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या नियमानुसार गॅस सिलेंडरचा वापर करावा. हॉटेल व व्यवसायिक प्रतिष्ठानांनी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून स्वयंपाक किंवा अन्य व्यावसायिक कामे करत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे पोहोचल्या आहेत.
तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, घरगुती गॅस फक्त घरगुती वापरासाठी असून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे, प्रत्येक व्यवसायाने त्यांच्या वर्गनिहाय क्षमतेनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक आहे.
असे उल्लंघन केल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ कलम ३ व ७ नुसार कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यवसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा दंडात्मक व दंडासह अन्य कार्यवाहीस सामोरे जावे लागेल, असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
