भटक्या-विमुक्त जातींना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यास आदिवासी पारधी क्रांती संघटनेचा तीव्र विरोध….
सिंदखेडराजा (अनिल दराडे )
भटक्या-विमुक्त जाती (उदा. बंजारा, धनगर) यांना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांना आदिवासी पारधी क्रांती संघटना, महाराष्ट्र प्रदेशने तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील निवेदन आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. विनोद हावेराव व जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय जयराम भोसले यांनी सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी यांना दिले.
संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, संविधानातील अनुच्छेद 341 व 342 अंतर्गत अनुसूचित जाती व जमातींची यादी फक्त राष्ट्रपती अधिसूचना व संसदेमार्फतच बदलली जाऊ शकते. राज्य सरकार किंवा इतर संस्थेला या यादीत बदल करण्याचा अधिकार नाही. तसेच अनुसूचित जमाती ठरविण्यासाठी भारत सरकारने आदिम वैशिष्ट्ये, भौगोलिक एकाकीपणा, समाजाशी कमी संपर्क व सामाजिक-आर्थिक मागासलेपणा हे चार निकष निश्चित केले आहेत. हे निकष बंजारा, धनगर व इतर भटक्या-विमुक्त समाजात आढळून येत नाहीत.
याव्यतिरिक्त रेणके आयोग (2008) व इदाते आयोग (2018) यांनी भटक्या-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग व स्वतंत्र आरक्षणाची शिफारस केली आहे. त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे चुकीचे असून यामुळे खरी आदिवासी जमातींवर गंभीर अन्याय होईल, असेही संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
आदिवासी पारधी क्रांती संघटनेने शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, भटक्या-विमुक्त समाजाचा ST प्रवर्गात समावेश करण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर त्यास तीव्र आंदोलन करून विरोध केला जाईल.
