गजानन संतोषराव वायाळ, काहीतरी नवीन करू शकण्याच्या शक्यतांनी ओसंडणारं कल्पक नेतृत्व…………………………
प्रतिनिधी (एकनाथ माळेकर चिखली)
काही निरपेक्ष नात्यांची गुंफण शब्दातीत असते.त्या नात्याच्या अभिव्यक्तीसाठी उघडाव्या लागतात गत संघर्षशील काळाच्या नक्षीदार खिडक्या.मग येतो आठवणींचा,जिव्हाळ प्रसंगांचा सुवासिक वारा,मांडणीसाठी करावी लागत नाही शब्दांची,भावनांची उसनवारी.लेखनासाठी रसद पुरविण्यासाठी सज्ज होतो गतकाल. गतकालाच्या मदतीला सरसावतो निरपेक्ष काळज्यांनी आभाळलेला काळ.गजानन संतोषराव वायाळ
म्हणजे कल्पकतेच्या बीजांच्या रुजवणूकीचे प्रियअधिष्ठान. धगधगत्या संघर्षाच्या आव्हानांचे शिवधनुष्य लिलया पेलणारी जिद्द,चिकाटी, एक मूर्तिमंत सकारात्मक झुंज.सातत्य गजानन संतोषराव वायाळ यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव.
हम अहेले दिल हैं नया मोअजजा दिखायेंगे
चराग बोयेंगे और रौशनी उगायेंगे
ध्येयाकडे वाटचाल करतांना कार्यकर्त्याला सतत क्रियाशील रहावं लागतं.विरोधाला, आव्हानांना समर्थपणे तोंड द्यावं लागतं. त्याशिवाय यशस्वी होणे शक्य नसते. काटछाटीनंतरच झाड डेरेदार होत असते. कल्पक, आश्वासक युवानेतृत्व, बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष,मेरा बुद्रुक ग्रामपंचायतचे कर्तबगार सदस्य, मनुबाई ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे उपक्रमशील अध्यक्ष गजानन संतोषराव वायाळ यांचा आज मंगलमय वाढदिवस.लेखणीच्या टोकावर फुलारत आहे गजानन वायाळ यांच्या जडणघडणीचा कातर, हळवा काळ. मनात भरून वाहत आहे संदर्भाची दुथडी नदी.
वाढदिवस येतात जातात .काही स्मरणात राहतात, काही विस्मृती जातात.काही मंडळी अशी असते की, त्यांच्या वाढदिवशी आतून आभाळून येते= मनाला अभिव्यक्तीचे धुमारे फुटू लागतात.वाढदिवसाच्या मंगलमयनिमित्ताने सृजनाची निनावी अस्वस्थता गच्च दाटून येते. गजानन वायाळ हे नाव देखील त्याच मांदियाळीतलं.
दरसाल गजानन वायाळ यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिण्यासाठी लेखणी उचलली की मी अचंबित होतो .प्रत्येक वर्षी त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख विस्तारलेला दिसतो. त्यांनी गाठलेला असतो आकलनापलीकडचा उन्नत राजकीय,सामाजिक टप्पा.नदी वाहती असावी.पात्र आपोआप रुंदावत जाते.गजानन वायाळ यांच्या धडपड्या स्वभावाला तुंबलेपण मान्य नाही. वाहत्या पाण्यात निसर्गदत्त शुद्धीकरणाची प्रक्रिया कार्यरत असते. तुंबलेलं पाणी कालांतराने दुषित होत जाते. नदीच्या प्रवाहीपणाशी गजानन वायाळ यांची आजतागायतची आयुष्ययात्रा तंतोतंत जुळलेली.मी चिकित्सकपणे जेंव्हा गजानन वायाळ यांच्या आयुष्ययात्रेवर नजर टाकतो तर त्यांचा भूतकाळ आव्हानांच्या काटेरी झुडपांनी वेढलेला दिसतो, आजमितीच्या स्थिरस्थावर वळणावर त्यांच्या जगण्याच्या पदरात आर्थीक स्थैर्याची, मानसन्मानाची जी मूठभर चैत्रपालवी दिसते त्याआधी त्यांच्या भूतकाळाचे सिंहावलोकन केल्यास संघर्षाच्या रखरखत्या वैशाखाची चिनचिन उन्हें प्रत्येक वळणावर ताकदीनिशी पिच्छा पुरवताना दिसतात, पडझडीचा वाळूकासारखा भेगाळलेला काळ सामोरा येतो,
हम ने जा कर देख लिया हद्दे नजर से आगे भी
राह गुजर ही राह गुजर है राह गुजर के आगे भी
आर्थीक सुबत्ता असलेल्या एकाद्या इसमाने राजकारणात, समाजकारणात गाठलेली उंची चर्चेचा वा लेखनाचा विषय ठरत नाही, कारण वाटचालीतल्या संकटांवर मात करणारी सगळी आयुधे त्याच्या गाठीशी असतात,आर्थिक सुबत्ता असलेला इसम मनात येईल तेंव्हा सामाजिक,राजकीय उत्तुंग भरारी घेऊ शकतो,पण गजानन वायाळ यांच्या पायतळीच्या सगळ्या वाटा संदिग्ध, चेहरा नसलेल्या,संदिग्ध वाटांवरून मार्गक्रमण करतांना त्यांच्यामधला आत्मविश्वास तसूभर देखील ढळला नाही,वाराचा उपहार म्हणून स्वीकारण्याची त्यांच्यातली उदात्त शैली त्यांना कणखर बनवत आली, एकाद्या प्रश्न उदभवला की त्याच्या निराकरणासाठी सगळी ताकद एकवटणे, प्रश्न वा समस्या मार्गी लागेपर्यंत स्वस्थ न बसणे राजकारणात दुरापास्त असलेले हे गुण त्यांना लोकाभिमुखतेच्या वाटा दर्शवत गेले.
हर मुश्किल का हल निकले गा
आज नहीं तो कल निकले गा
गजानन वायाळ यांची परिस्थिती जेमतेम, उदरभरणाच्या नावावर कोरडवाहू जमिनीचा लहानसा तुकडा, घराला राजकारणाचा वसा ना वारसा, अशात गजानन वायाळ यांच्या मातोश्री श्रीमती बेबीताई वायाळ यांना लोकआग्रहस्तव ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागली, वायाळ परिवाराचे सर्वजातीधर्माशी अगदी सलोख्याचे संबंध, आश्चर्य म्हणजे त्या निवडणूकीत बेबीताईंचा घसघशीत मतांनी विजय झाला, त्या मेरा बुद्रुक गावच्या सरपंच झाल्या, सरपंचपदी आरूढ झाल्यानंतरचा खडतर रस्ता अक्काने कैक आव्हानांना तोंड देत समर्थपणे चोखाळला, कणखर, धडाडीची महिला सरपंच म्हणून अक्काच्या नावाची नोंद मेरा बुद्रुक गावच्या राजकरणात ठळकपणे झाली,
मी पायधूळ घेतो
जेव्हा तुझी जराशी
माझी ललाट रेषा
बनते प्रयागकाशी
गजानन वायाळ यांची आईवर असलेली श्रद्धा शब्दातीत, आईनेच गजानन वायाळ यांच्या पंखात सतत बळ ओतले, सज्ज केले सामाजिक,राजकीय आकाशात उंच भरारी घेण्यासाठी,
मातृतिचं सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघात चिखली विधानसभा मतदारसंघातली २२ गावे नव्याने समाविष्ट झाली, या समावेशामुळे गजानन वायाळ यांच्या सकारात्मक नेतृत्वाला खरी कलाटणी मिळाली, सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे मा आमदार डॉ राजेंद्र शिगणे साहेब यांनी आपल्या ३५ वर्षीय कारकिर्दीत मुवाशक्तीला, सळसळत्या तरुणाईला सतत बळ देण्याचं काम केलं, संयत, संयमी, क्रियाशील गजानन वायाळ यांनी संघटनकौशल्याच्या आणि निरपेक्ष निष्ठेच्या शिदोरीवर साहेबांची मजीं संपादन केली,
साहेबांनी देखील गजानन वायाळ यांच्या प्रत्येक विधायक मागणीला दुजोरा दिला, कोणत्याही भौगोलिक प्रदेशाच्या माध्यावर एक धरण असले पाहिजे, धारणाखालच्या पट्टयाततली झाडे हिरवी आणि लेंडीनदीनाले खळाळत राहतात, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते, गजानन वायाळ यांच्या राजकीय प्रवासाच्या माध्यावरचं धरण म्हणजे डॉ राजेंद्र शिंगणे साहेब, सिंदखेडराजा तालुक्यात, बुलडाणा जिल्ह्यात साहेबांच्या वरदहस्तामुळे वसा, वारसा नसलेले जे तळागाळातील कार्यकर्ते नावारूपाला आले त्या श्रृंखलेत गजानन वायाळ यांचं नाव आग्रगणी,
गजानन वायाळ यांनी आपला वावर राजकारणापुरता मर्यादित ठेवला नाही. राजकारण, समाजकारणाबरोबर सहकारक्षेत्रात देखील त्यांची दमदार वाटचाल सुरू आहे, गत १2 वर्षांपासून ते मनुबाई, गुंजाळा ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आहेत,
मेरा बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूकीत गजानन वायाळ यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखालील पॅनलने १३ पैकी ७ जागा जिंकून घसघशीत विजय मिळवला, सरपंचपदाची सूत्रे पॅनलच्या हाती आल्यावर विजयाच्या आनंदाला डाव्या कंसात टाकून गावच्या पाणीसमस्येला त्यांनी प्राधान्य दिले, २० ते २५ वर्षापासून गावकऱ्यांना पाणीसमस्या मेटाकुटीस आणत होती, पाणीसमस्येचे भिजत घोंगडे झाले होते, पाणीसमस्या सोडविण्याचा त्यांनी विडा उचलला, अस्तित्वात असलेल्या पण विस्कळीत झालेल्या साधनसामुग्रीचे योग्य नियोजन केले, मतदारांना दिलेल्या शब्दाची बूज राखत महिनाभरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न धसास लावला, १५ कोटीची नळयोजना गावासाठी मंजूर करून आणली, पाणीसमस्येबरोबर गावातल्या इतर समस्यांवर ताकदीनिशी लक्ष केंद्रीत केले, सार्वजनिक स्मशानभूमीची दुरवस्था झाली होती, अंत्यविधीच्या वेळी कैक समस्या उदभवायच्या, पावसाळ्यात तर अंत्यविधीसाठी आपदग्रस्त कुंटुंबियांची अक्षरशः दमछाक व्हायची, योग्य निधीची तरतूद करून टिनशेडची उभारणी, आसनव्यवस्था ते अख्ख्या स्मशानभूमीचे सौदर्यकरण करण्यात आले, स्मशानभूमी परिसरात विविध फुलझाडांची निगुतीने लागवड करून एक हिरवागार बगीचा विकसीत करण्यात आला,
जिंदगी में सदा मुस्कुराते रहो
फासले कम करो दिल मिलाते रहो
दर्द कैसा भी हो आँख नम ना करो
रात काली सही कोई गम ना करो
एक सितारा बनो जगमगाते रहो
अख्ख्या बुलडाणा जिल्ह्यात नसेल असे ग्रामपंचायतच्या मालकीचे विस्तीर्ण मंगलकार्यालय उभारण्यात गजानन वायाळ यांच्या कल्पक नेतृत्वात ग्रापंचायत्त मेरा बुद्रुकला यश आले, शिवाय आगळेवेगळे उपक्रम राबविण्यात्त मेरा बुद्रुक ग्रामपंचायत जिल्ह्यात सतत आघाडीवर राहिली आहे, जि प बुलडाणा तर्फे प्रसिद्ध झालेल्या
नवप्रवर्तन नावाच्या वार्षिक अहवालात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी देखील एका आकर्षक, स्वतंत्र पानावर मेरा बुद्रुक ग्रामपंचायतचे तोंडभरून कौतूक केले, ज्या व्यक्तीने घरपट्टी, नळपट्टी थकबाकीसह कर भरला अशा व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची कल्पना गावकऱ्यांनी उचलून धरली, या अभिनव कल्पनेला गावपातळीवर भरभरून प्रतिसाद मिळाला, ग्रामपंचायतचा १०० टक्के कर भरणाऱ्या महिलांकडून तसेच सेवानिवृत्त सैनिकांकडून ध्वजारोहण करण्यात आले,गजानन वायाळ यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाला संकुचितपणा चुकून शिवला नाही, सर्वजातीधर्माची मंडळी आपल्यावर भरभरून प्रेम करते या कृतज्ञ जाणिवेपोटी प्रत्येक धर्माच्या सणावाराला त्यांनी कृतीशील महत्व दिले, बौद्धविहाराचे सौदर्यीकरण, भिमजयंतीच्या दिवशी भिमगीतांच्या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले, प्रकाशदिप वानखेडे सारख्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भिमगायकाने मेरा बुद्रुकसारख्या आडवळणी गावात गजानन वायाळ यांच्या भिमभक्तीखातर हजेरी लावली,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा भव्यदिव्य पुतळा मातंगवस्तीत उभारला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती देखील त्यांनी गावात धुमधडाक्यात साजरी केली, हजरत हातीम शाह मियाँ यांच्या दर्ग्यात कव्वालीचे आयोजन असो वा संदल शरीफनिमित्त चादर चढविणे असो प्रत्येक ठिकाणी गजानन वायाळ यांची सश्रद्ध हजेरी.खंडेरायाच्या मंदिराच्या पावन परिसरात पेव्हर ब्लॉक बसवून खंडेरायाच्या मंदिराच्या वैभवात भर घातली.मनुबाई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी.कोरोनाच्या महामारीत माणसे माणसांपासून दूर पळत होती,उपासमारीच्या दैत्याने आपला जबडा वासला होता त्या भीषण काळात गोरगरिबांना हजारो, लाखो रुपयांचा किराणा किट वितरीत करण्याची महत्तम कामगिरी गजानन वायाळ यांनी बजावून माणूसकीधर्म पाळला.तरुणाईसाठी व्यायामशाळा,उज्जवल भवितव्याच्या रोखाने झेपावव्यासाठी अभ्यासिकी, साळभर काळ्या मातीत राबणाऱ्या बळीराजाला विरंगुळा म्हणून शंकरपटाचे आयोजन,क्रिडासंस्कृतीचे जतन करण्यासाठी किर्केट सामन्यांचे आयोजन,मेरा बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सौदर्यीकरण.समाजोपयोगी विकासकामांची भलीमोठी उंच उतरंड रचण्यात गजानन वायाळ यशस्वी झाले.एवढ्यावरच ते समाधानी नाहीत.विकासकामांचा आवाक्यापलीकडचा पल्ला अद्याप त्यांना गाठायचा आहे.गजानन वायाळ म्हणजे काहीतरी नवीन करू शकण्याचीच्या शक्यतांनी ओसंडणारं कल्पक नेतृत्व आहे.
बांटना है अगर बांट दो हर खुशी
गम ना जाहीर करो तुम किसी पे कभी
दिल की गहेराई में गम छुपाते रहो
जिंदगी में सदा मुस्कुराते रहो.
मुस्लिम समाजातील आजतागायत भिजत घोंगडे झालेल्या समस्या धसास लावण्यासाठी त्यांनी आपली सगळी राजकीयशक्ती पणाला लावली.मुस्लिम शादीखान्याची समस्या, आधी मुस्लिम कब्रस्तानात रात्रीच्या दफनविधीच्या वेळी अंधार असायचा, मोठ्या मुश्किलीने दफनविधी पार पडायचा.गजानन वायाळ यांनी मुस्लिम कब्रस्तनात विद्युतीकरण केले, रात्रीच्या दफनविधीची समस्या कायमची सुटली.ईदच्या आदल्या रात्री वा सकाळी पाऊस कोसळला तर मेरा बुद्रुग ईदगाहकडे जाणारा रस्ता चिखलमय होऊन जायचा, सालोसाल ही समस्या मुस्लिमसमाजाला भेडसावत होती,गजानन वायाळ यांनी तत्पर तोडगा काढला.नमाजगाहकडे जाणारा रस्ता अस्तित्वात आला,मुस्लिमसमाजाचा रमझान आणि बकर ईदचा आनंद द्विगुणित करण्याचे सर्वश्रेय गजानन वायाळ यांच्या पुरोगामी नेतृत्वाला जाते.
ह से हिंदू बने और म से मुस्लिम बने
इन दो शब्दों को मिला दो तो हम बने
गजानन वायाळ यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या आठवड्याला विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्सवी स्वरूप दिले, गावकऱ्यांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वैचारीक मेजवानी देण्याचा स्तुत्य पायंडा गजानन वायाळ यांनी पाडला, प्रख्यात वऱ्हाडी कवी डॉ मिर्जा रफी अहेमद बेग यांचा मिर्जा एक्सप्रेस हा विनोदी कार्यक्रम असो वा आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम हरेक आयोजनात गजानन बायाळ यांच्यातल्या कल्पक, प्रगल्भ नेतृत्वाची चुणूक गावकऱ्यांनी अनुभवली, गजानन वायाळ यांनी आपले नेतृत्व फक्त गावापुरते मर्यादित केले नाही तर मेरा पंचक्रोशीतील २२ गावांमधील समस्यांना देखील त्यांनी प्राधान्य दिले, त्यांच्या लोकाभिमुखतेची ही एक जमेची बाजू म्हणता येईल, २२ गावातील कार्यकर्त्यांचा साहेबांपर्यंत पोहचवण्याचा – रस्ता प्रशस्त करण्यामध्ये गजानन वायाळ यांनी महत्वाची भूमिका आजतागायत बजावली, घाव पडल्यावरही घायाळ न होता अव्याहतपणे कार्यरत राहण्याचा त्यांचा पिंड असल्याने त्यांची वाढ बिनदिक्कतपणे होत गेली, गजानन बायाळ यांना माणसे जोडण्याची कला अवगत आहे, माणसांत उगवलेला दिवस माणसातच मावळतो, कुठलाही गाजावाजा न करता ते दोस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात,
झालेले प्रहार खिजगणतीत ठेवण्याची सवय गजानन वायाळ यांना नाही, हेवेदाव्यांची, प्रतिशोधाची बेगमी त्यांनी कधी केली नाही, समजगैरसमजाची रेवडी चघळत नात्यांमध्ये गुंतवळ वाढविण्याचे त्यांनी सदा टाळले, परिणामी जिल्हाभरात – त्यांचा गोतावळा झपाट्याने फैलावत गेला, मैत्रीची शिवण भक्कम होत गेली ,उत्तम – सांगितिक भान असलेले गजानन वायाळ, संगितिक आवडीमुळेच माझे आणि त्यांचे ऋणानुबंध दुणावले, मला हिंदी चित्रपटातील अवीट गोडीच्या दर्जेदार गाण्याची – आवड आणि गजानन वायाळ यांचाही तोच छंद, गजानन वायाळ माझ्या सहवासात आल्यावर साहित्य वाचनाची त्यांना सवय जडली, वाचनाचा व्यासंग दांडगा झाला, वाचनातून मिळणारी भाषेची प्रासादिक सौष्ठवपूर्ण रसद भाषणात कामी येऊ लागली,परिणामी त्यांचे वक्तृत्व फुलारले,
गजानन वायाळ यांच्या आश्वासक कारकिर्दीला उत्कर्षाची अगणित क्षितिजे अजून कवेत घ्यायची आहेत, ही तर प्रारंभिची लुसलुशीत पालवी आहे. मानसन्मानाचा जोमदार बहर त्यांच्या कारकिदींच्या प्रतिक्षेत आहे, कैक स्वप्ने साकारतेला खुणावत तिष्ठत उभी आहेत.
आज गजानन वायाळ यांच्या वाढदिवसाच्या मंगलदिनी त्यांच्या चाहत्यांचा देह झाला आहे प्रार्थनांचा देव्हारा .शुभेच्छांच्या गुलमोहरांनी सजल्या, मोहरल्या, बहरल्या आहेत हितचिंतकांच्या मनाच्या संगरमरवरी वाटा.प्रत्येक जण गुणगुणत आहे ह्या मधाळ,रसाळ ओळी
धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना.
अजीम नवाज राही
9421396669
साहिल हाऊस,जाफ्राबाद मोहोल्ला.
मु पो साखरखेर्डा. ता सिंदखेडराजा.
जि बुलडाणा.
