देऊळगाव राजा उपविभागात शांतता समितीची सभा संपन्न
देऊळगाव राजा सिंदखेडराजा (अनिल दराडे ) देऊळगाव राजा पोलीस उपविभागामार्फत आज शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोल गायकवाड (म.पो.से.) अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, तसेच श्रीमती मनिषा कदम (म.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, सिंदखेडराजा उपस्थित होते. यावेळी देऊळगाव राजा, किनगाव राजा व अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार, दुय्यम ठाणेदार जारवाल साहेब आणि महसूल विभागाचे नायब तहसीलदार मुंडे यांचीही उपस्थिती लाभली.
सभेत आगामी देऊळगाव राजा बालाजी यात्रा महोत्सव, दुर्गादेवी महोत्सव व नवरात्र उत्सव या पारंपरिक धार्मिक सोहळ्यांच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही, याबाबत सर्व सदस्यांनी एकमुखाने निर्धार व्यक्त केला.
तसेच समाजातील सर्वांनी उत्सवांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे, शांती, सौहार्द आणि धार्मिक सलोखा अबाधित राखावा, असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी अनेक पत्रकार, समिती सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार हनीफ शेख यांनी शांतता समितीत आपले मनोगत मांडून काही रचनात्मक सूचना दिल्या.
