लोणार शहरातील स्ट्रीट लाईट बंद; नागरिक अंधारात, प्रशासनाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार,”नगरपरिषदेच्या भोंगळ कारभा रावर मो. तौसिफ मो. तौफीक कुरेशी, मा शहराध्यक्ष युवा काँग्रेस लोणार यांचा संताप”
लोणार (यासीन शेख) : जगप्रसिद्ध व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले लोणार शहर आज मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप मोहम्मद तौसिफ, मा शहराध्यक्ष युवा काँग्रेस लोणार यांनी केला आहे. शहरातील रस्त्यांवर स्ट्रीट लाईटचा तीव्र अभाव असून, नागरिक अनेक दिवसांपासून अंधारात राहत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
कुरेशी यांनी आपल्या 29 सप्टेंबर 2025 रोजी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन स्ट्रीट लाईट खरेदी करण्याऐवजी जुने दिवे दुरुस्त करून ठिकठिकाणी बसवले जात आहेत. त्यामुळे बहुतांश रस्ते अंधारात बुडाले असून अपघात व गुन्हेगारीला खतपाणी घातले जात आहे. नागरिक असुरक्षित परिस्थितीत जीवन जगत आहेत.विशेष म्हणजे काही ठिकाणी फक्त पुढाऱ्यांच्या घरासमोरच दिवे लावले जात असून, गोरगरीब व अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये वर्षानुवर्षे बंद असलेले दिवे अद्याप बदलले गेले नाहीत. घरकुल वस्ती, रोशनपुरा, आझाद नगर, शिक्षक कॉलनी, शिवाजी कॉलनी, वाल्मिकी नगर, बुध्दवाडा, कुरेशी मोहल्ला, नवी नगरी साबुणपुरा व जमजम कॉलनी याठिकाणी गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
“अंधेर नगरी चौपट राज” अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत कुरेशी यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून नागरिकांना तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली असून, तिची प्रत आमदार सिद्धार्थ खरात यांनाही देण्यात आली आहे. आता झोपलेले नगरपरिषद प्रशासन कधी ॲक्शन मोडवर येतो याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
