पुरात वाहून गेला २६ वर्षीय तरुण; सायंकाळी सहा वाजता मिळाला त्याचा मृतदेह लोणार तालुक्यातील महार चिकना येथील घटना

IMG-20250627-WA0006

लोणार : लोणार तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी दिली. तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने नद्या नाळ्यांना पूर आले.या पुरात २६ वर्षीय युवक वाहून गेला. सकाळी वाहून गेलेल्या या युवकाचा सायंकाळी सहा वाजता मृतदेह मिळाला. २६ जूनरोजी लोणार तालुक्याला धुव्वाधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने नद्या व नाल्यांना पूर आले आहेत. महार चिकना फाट्यावरील पवन वाईन बार येथे कामाला असलेला युवक रोहिदास श्रावण शिरसाट (वय २६) रा. दादुल गव्हाण हा आज पहाटे पवन वाईन बारच्या मागील बाजूस लागून असलेल्या नाल्याजवळ शौचासाठी गेला होता. ओढ्याला अचानक पूर आल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुरामध्ये वाहून गेला. या युवकाचा बारमालक व गावकऱ्यांनी इतरत्र शोधाशोध घेतली असता, तो मिळून आला नाही. लगेचच बारचे मालक ढाकणे यांनी बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे कर्मचारी, तसेच बारचे मालक व गावकरी, महसूल कर्मचारी या वाहून गेलेल्या युवकाचा दिवसभर शोध घेतला. तेव्हा, सायंकाळी ६ वाजता बारच्या लगतच नाल्याच्या बाजूला पुलामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. आज सकाळपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नाल्याला खूप मोठा पूर आला असून, भरपावसात ही शोधाशोध सुरू होती. मृतदेहाचा पंचनामा करून शवपरीक्षणासाठी बिबी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!