परंपरेला बोलीचे गालबोट : श्री बालाजी महाराज यात्रेवर लिलावाची सावली

IMG-20251008-WA0014

सिंदखेडराजा अनिल दराडे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराज यात्रोत्सवात यंदा ‘बोली’चा बाजार भरवला जात असल्याने, संतप्त व्यावसायिक व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.प्रशासन व श्री बालाजी महाराज संस्थान यांनी अचानक घेतलेल्या निर्णयानुसार, यावर्षी यात्रेतील मनोरंजन साधने – जसे की रहाटपाळणे, खेळ, झोपाळे यांसाठी जागा लिलावाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. हा निर्णय परंपरेविरोधात असून पारंपरिक व्यवसायिकांवर अन्याय करणारा आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, हा निर्णय नेमका कोणत्या कायद्याअंतर्गत घेतला आहे हे न व्यावसायिकांना कळले आहे, न सामान्य जनतेला.
व्यवसायिकांचा थेट सवाल आहे :

“लिलाव पद्धतीने जागा देण्याचा अधिकार संस्थान किंवा प्रशासनाला कसा प्राप्त झाला?
हे परवाने कोणत्या अधिनियमाच्या अथवा शासकीय आदेशाच्या आधारे दिले जात आहेत?”

या प्रश्नांना प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे संशयाचा गडद धूर पसरलेला आहे.

विनामूल्य जागेची ऐतिहासिक परंपरा मिळाली धुळीस

बालाजी महाराज यात्रेत वर्षानुवर्षे पारंपरिक व्यावसायिकांना कोणतेही शुल्क न आकारता जागा उपलब्ध करून देण्याची परंपरा आहे.
श्रद्धेपोटी काही व्यवसायिक स्वेच्छेने देणगी अर्पण करत असले तरी कोणतीही सक्ती नव्हती.

मात्र, यावर्षी बोल्या लावून जागा मिळणार, याची अंमलबजावणी दसऱ्याच्या तोंडावर अचानक जाहीर करण्यात आली.
यामुळे शेकडो वर्षांची परंपरा धुळीला मिळवली गेली, असा संतप्त सूर आहे.

वर्षानुवर्षे यात्रेत व्यवसाय करणाऱ्या एनओसी धारकांनी स्पष्टपणे लिलाव पद्धतीला विरोध केला असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
त्यांनी निवेदनात नमूद केले असे की,“तुम्ही परवाने आम्हाला देता, पण यंदा जागा बोली लावून देणार? हा दुजाभाव का?वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय का?”असा संतप्त सवाल व्यावसायिक विचारत आहे.

राजकीय हस्तक्षेप आणि षडयंत्राचा आरोप

स्थानिक राजकारणाचा यात थेट हस्तक्षेप असल्याचीही चर्चा आहे.यात्रा उत्सव समितीवर विशिष्ट गटाचा प्रभाव असून पारंपरिक वाटप प्रक्रियेवर गालबोट लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

व्यवसायिकांची ठाम मागणी केली असून हा लिलाव त्वरित रद्द करावा.परंपरेप्रमाणे जागा विनामूल्य वाटप कराव्यात.कोणत्या कायद्याने लिलाव केला जात आहे, याचे स्पष्टीकरण देण्यात यावे.परवाने देण्याची प्रक्रिया पारदर्शक करण्यात यावी.

श्रद्धेच्या यात्रेत “बोलीचा बाजार” योग्य का?

ही यात्रा ही धार्मिक श्रद्धेची, ऐतिहासिक वारशाची आणि सांस्कृतिक ओळखीची प्रतीक आहे.
यात्रेत बोली लावणं म्हणजे केवळ परंपरेचा अपमान नाही, तर जनतेच्या भावनांची थट्टा आहे.
जर श्रींच्या यात्रेतच व्यवहार आणि बोलीचा अंमल असेल, तर यात आणि इतर बाजारात फरक काय उरेल? हा देखील भाविकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. येणाऱ्या काळात शासन आणि प्रशासन याकडे कोणत्या नजरेने पाहणार हा काळच ठरवेल.

You may have missed

error: Content is protected !!