समृद्धी महामार्गावर दोन अपघात: एक तरुणी ठार, पाच जण जखमी
सिंदखेडराजा (अनिल दराडे)
(8 ऑक्टोबर 2025) – समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत एक तरुणीचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
पहिला अपघात सीएच नंबर 296.900 जवळ घडला. भद्रक (ओडिशा) येथील प्रदीप मुला आणि शिवानंद दास हे त्यांच्या ओडी 02 DF 3553 या कारने जात असताना, समोरून येणाऱ्या NL 01 AG 5793 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. धडकेनंतर कार ट्रकने काही अंतर ओढत नेली. यामध्ये दोघे जखमी झाले असून, त्यांच्यासोबतचे सौरभ प्रधान आणि ओसरवरी दास देखील थोड्या अंतरावर जखमी अवस्थेत सापडले. सर्व जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचालक राजेश काळे (वय 24, रा. रिवा, मध्यप्रदेश) घटनास्थळी उपस्थित होता.
दुसरा अपघात चॅनल नंबर 332.800 (नागपूर कॉरिडॉर) येथे घडला. केएल 07 बीजे 3915 क्रमांकाच्या कारचे टायर फुटल्याने चालक नयाज पाशा (42, रा. बेंगळुरू) यांनी ती पहिल्या लेनमध्ये थांबवली होती. ते कारच्या समोर उभे होते. त्यांच्या सोबत प्रवासी अखिला (50) आणि सुहाना (18) हे देखील बाहेर उभे होते. याचवेळी मागून येणाऱ्या GJ 05 RE 8985 क्रमांकाच्या कारने त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली.
धडकेमुळे सुहाना ही तरुणी पुलाखाली पडून जागीच ठार झाली. चालक नयाज पाशा गंभीर जखमी असून, त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात धडक देणाऱ्या कारमधील चालक किशोर कुमार (40, रा. सुरत, गुजरात) आणि इतर पाच प्रवासी सुखरूप आहेत.
सिंदखेडराजा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
