दुसरबीड मंडळ व सिंदखेडराजा तालुक्याची आनेवारी सुधारण्याची मागणी
सिंदखेड राजा (अनिल दराडे)
दुसरबीड मंडळ व सिंदखेडराजा तालुक्यात यंदा ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला असून, चुकीची आनेवारी काढल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर दुसरबीड मंडळाची आनेवारी पुन्हा तपासून ती ५० पैशांपेक्षा कमी ठेवण्यात यावी, अशी मागणी शेतकरी जुनेद अली यांनी तहसीलदार सिंदखेडराजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दुसरबीड मंडळाची प्राथमिक आनेवारी अंदाजे ५५ पैसे इतकी काढण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पाहता तालुक्यातील पिकांना ओल्या दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले असून, सध्याची आनेवारी वस्तुस्थितीशी विसंगत आहे. त्यामुळे चुकीच्या आनेवारीमुळे शेतकऱ्यांना दुष्काळी मदत आणि पिकविमा योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.
जुनेद अली यांनी पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या हितासाठी अंतीम आनेवारी योग्य पद्धतीने काढून ५० पैशांपेक्षा कमी ठेवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा लाभ मिळेल.
