राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय : रविवारीही नामनिर्देशनपत्र स्वीकारणार उमेदवारांची गर्दी; अर्ज व मतदार याद्यांच्या वाटपाला वेग
सिंदखेडराजा (अनिल दराडे) नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना सोयीचे व्हावे यासाठी रविवार, १६ नोव्हेंबर रोजीदेखील ऑफलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. रविवारी कार्यालये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुले राहणार आहेत.ऑनलाईनव्यतिरिक्त ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध असून, आयोगाने उमेदवारांना अंतिम क्षणाची धावपळ टाळण्यासाठी रविवारीच अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज व मतदार याद्या वाटपाला वेग
आज निवडणूक कार्यालयात एकूण २१ अर्जांची विक्री झाली. मागील पाच दिवसांत मिळून १०४ अर्ज विक्री झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मतदार याद्यांच्या वाटपातही वाढ दिसून आली असून, आज ६ मतदार याद्या वाटप झाल्या. मागील पाच दिवसांत वितरित झालेल्या याद्या मिळून हा आकडा ९४ वर पोहोचला आहे.
आज एक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले असून, मागील पाच दिवसांतील नामनिर्देशनांची एकूण संख्या ४ इतकी आहे.
उमेदवारांनी रविवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्यास शेवटच्या दिवशीची गर्दी टळेल, असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे.
