सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला पाठिंबा…
सिंदखेड राजा (अनिल दराडे) नगर परिषदेची आगामी निवडणूक आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. अनेक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची आणि अत्यंत कस लागणारी ठरलेली आहे. कारण, या निवडणुकीच्या रणांगणात एका मोठ्या राजकीय समीकरणाची भर पडली आहे.
वंचित बहुजन आघाडीने (VBA) शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
आज वंचित बहुजन आघाडीचे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष, मधुकर साळवे यांनी पक्षाच्या नेत्या सविताताई मुंढे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. यावेळी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत पाठिंब्याचे पत्र डॉ.शिंगणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
‘या पाठिंब्यामुळे सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) पक्षाची ताकद लक्षणीय वाढली आहे. आणि ही आघाडी आता निवडणुकीत निर्णायक ‘लीड’ घेईल’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
सिंदखेड राजा नगर परिषद निवडणुकीत ही युती अत्यंत गेमचेंजर ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
एका बाजूला ही निवडणूक अनेक पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरत असताना, वंचित बहुजन आघाडीच्या निष्ठावान मतदारांची साथ मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरद पवार गट) मोठा आधार मिळाला आहे.
या एकत्रित ताकदीमुळे राष्ट्रवादी निवडणुकीत मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करू शकते.येत्या काही दिवसांत या युतीचा मतदानावर नेमका काय परिणाम होतो आणि विरोधकांची पुढची रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण सिंदखेड राजावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
