तांदुळवाडी येथे मोठी घरफोडी , ६ लाख १३ हजाराचा ऐवज लंपास , साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ…..
साखरखेर्डा ( एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी ) साखरखेर्डा , शिंदी पाठोपाठ तांदुळवाडी येथे सुध्दा चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून ४ डिसेंबर रोजी रात्री घरफोडी करून ६ लाख १३ हजाराचा ऐवज लंपास केला आहे .साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत तांदुळवाडी येथे अंकुश शालीग्राम आकाळ मॅनेजर सेंट्रल बँक चिखली यांच्या राहत्या घरी ४ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला . ही बाब शालीग्राम आकाळ यांच्या लक्षात आली . शालीग्राम आकाळ हे भोरसा भोरसी येथे चुलच बहिणीकडे कुंकवाचा कार्यक्रम असल्याने गेले होते . ५ डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथे किराणा सामान व वांगी घेण्यासाठी आले असता त्यांना पैसे कमी पडले म्हणून तांदुळवाडी येथे आले असता घराचे कुलूप तोडलेले आढळून आले . घरात प्रवेश केला असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते . त्यांनी पेटी उघडून पाहिले असता त्यातील ४० हजार रुपये रोख दिसून आले नाही . दुसऱ्या खोलीतही सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले . त्यांनी अंकुश यास फोनवर माहिती दिली असता आई आणि चुलत भाऊ यांना सोबत घेऊन तांदुळवाडी गाठले . घरातील आतील बेडरूम मध्ये गेला असता लोखंडी पेटीत असलेले चांदीचे ५ तोळे दागिने ५ हजार रुपये , लहान मुलांचे दागिने १० हजार रुपये , सौभाग्यवती पोत ५ तोळे किंमत ५ लाख ५५ हजार रुपये , नगदी ३ हजार रुपये असा एकूण ६ लाख १३ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले . याची तंक्रार साखरखेर्डा पोलिस ठाण्यात दिली असून तंक्रार पुढील तपासासाठी ठेवण्यात आली आहे . साखरखेर्डा पोलिसांनी योग्य पध्दतीने तपास करुन चोरट्यांचा शोध घ्यावा . अशी मागणी अंकुश शालीग्राम आकाळ यांनी केली आहे .
