नागरे महाविद्यालयात प्रधानमंत्री उज्वला योजना जनजागृती अभियान संपन्न

IMG-20251215-WA0022


सिंदखेडराजा (अनिल दराडे)दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात प्रधानमंत्री उज्वला योजना जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ इंधनाच्या वापरातून महिलांचे आरोग्य, कुटुंबाची सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षण याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे (अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती) होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राध्यापक बी. ए. खरात सर तसेच इंडियन गॅस एजन्सीचे संचालक श्री. निवृत्ती वायाळ उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. निवृत्ती वायाळ यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळवण्याची प्रक्रिया, गॅस सिलिंडरचा सुरक्षित वापर, गॅस लीक झाल्यास घ्यावयाची काळजी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी सविस्तर माहिती दिली. दर दोन वर्षांनी गॅस कनेक्शनचे इन्स्पेक्शन करून घेणे अनिवार्य असून, ते न केल्यास विमा संरक्षण मिळत नाही, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. घरगुती सुरक्षेच्या दृष्टीने गॅस वापरातील लहानसहान चुकाही मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर माजी प्राध्यापक बी. ए. खरात सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आपल्या लेखन अनुभवांबद्दल सांगताना वाचन, लेखन आणि विचारप्रवृत्ती विकसित करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी समाजातील विविध प्रश्नांकडे संवेदनशील दृष्टीने पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्री उज्वला योजनेचे सामाजिक महत्त्व विशद केले. स्वच्छ इंधनामुळे महिलांचे आरोग्य सुधारते, घरातील कामकाज सुलभ होते आणि कुटुंबाची एकूण जीवनशैली उंचावते, असे त्यांनी नमूद केले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे घरातील कर्ते सदस्य असतील, त्यामुळे घरातील जबाबदारी स्वीकारताना सुरक्षितता, शिस्त आणि जागरूकता यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रा. सुधाकर तारे, प्रा. शेख युनुस, प्रा. मिलिंद गवई, प्राध्यापिका नयना गवारे, प्रा. शंकर मेहेर, प्रा. देवानंद नागरे, प्रा. सत्यम श्रीवास्तव, प्रा. जगदीश यादव, श्री. अनिल रणमाळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी नागरे या विद्यार्थिनीने आत्मविश्वासाने केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. दिपक देशमाने यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी सानप या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

You may have missed

error: Content is protected !!