शेंदुर्जनच्या ‘या’ मराठी शाळेने जिंकली पालकांची मने…..
सिंदखेडराजा (अनिल दराडे) आजच्या युगात इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले असताना आणि शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असताना, शेंदुर्जन येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेने मात्र एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. गोरगरिबांच्या मुलांसाठी ही शाळा आता केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता प्रगतीचे एक ‘पॉवर हाऊस’ ठरत आहे. यामुळेच परिसरातील पालकांची ओढ आता महागड्या खासगी शाळांकडे नसून या मराठी शाळेकडे मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
खासगी शाळांना ‘चेकमेंट’; खेळांतून आणि गाण्यांतून शिक्षण!
जी मुले महागड्या शाळांची फी भरू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्या हाय-फाय शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड बनवण्याचे शिवधनुष्य येथील शिक्षकांनी पेलले आहे. शाळेतील ६ तास विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणे नसून आनंदाची मेजवानी ठरत आहेत.येथे खेळाच्या माध्यमातून व्यायाम आणि गाण्यांच्या माध्यमातून कठीण अभ्यासक्रम सहज सोपा करून शिकवला जातो. मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षक दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
” आमच्यावरचा विश्वास सार्थ ठरणारच!” – शिक्षकांचा निर्धार
या यशाबाबत शिक्षकांशी चर्चा केली असता, त्यांचा आत्मविश्वास दाखावण्या जोगा होता. मुख्याध्यापक पत्रे सर म्हणाले की, “गोरगरीब पालकांनी आपल्या पोटच्या गोळ्याला मोठ्या विश्वासाने आमच्या पदरात टाकले आहे. त्यांचा हा विश्वास आम्ही कधीही तुटू देणार नाही. ही मुले जेव्हा राज्यस्तरावर चमकतात, तेव्हाच आम्हाला आमच्या कष्टाची खरी पावती मिळते.”शेंदुर्जन येथील या शाळेचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे येथील ‘झपाटलेली टीम’. सर्व शिक्षकांमध्ये असलेल्या विलक्षण ताळमेळ आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळेच या शाळेचा दर्जा उंचावला आहे. परिणामी, जे पालक पूर्वी कॉन्व्हेंटच्या मागे धावत होते, ते आता अभिमानाने आपल्या पाल्यांना या मराठी शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत. थोडक्यात सांगायचे तर, जिद्द आणि योग्य दिशा असेल तर सरकारी किंवा मराठी शाळा ही कोणत्याही कॉर्पोरेट शाळेला मागे टाकू शकते, हे शेंदुर्जनच्या मुख्याध्यापक पत्रे सर, बोरडे सर, मेरत सर, शिंगणे सर या शिक्षकांनी सिद्ध करून दाखवले आहे.
