रब्बी हंगाम ई-पीक पाहणीस प्रारंभ शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन; २४ जानेवारीपर्यंत मुदतनोंदणीअभावी पीक विमा व अनुदानास अडचणी….
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) यंदाच्या रब्बी हंगाम ई-पीक पाहणी उपक्रमाची सुरुवात १० डिसेंबरपासून करण्यात आली असून, या अंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा स्वतः अँड्रॉईड मोबाईलद्वारे नोंदवणे बंधनकारक आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची अंतिम मुदत २४ जानेवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
रब्बी हंगाम २०२५ ई-पीक पाहणी अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत ३४,७४३.७१ हेक्टर क्षेत्रावर पीक नोंद झाली असून, एकूण ७,९९,१९५ मालक प्लॉटपैकी ३१,००२ प्लॉटवर संबंधित शेतकऱ्यांनी डीसीएस व्हर्जन 4.0.5 या मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १५.२९ टक्के क्षेत्रावरच ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित क्षेत्रावर अद्याप नोंदणी होणे बाकी आहे.
ई-पीक पाहणीसाठी अँड्रॉईड मोबाईल आवश्यक असून, शेतकऱ्यांनी गुगल क्रोम अपडेट करून ई-पीक पाहणी व्हर्जन 4.0.5 अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे. शेत बांधावर जाऊन प्रत्यक्ष पीक स्थितीची नोंद करून माहिती अपलोड करणे अपेक्षित आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध नाही किंवा अॅप हाताळण्यात अडचण येत आहे, त्यांनी संबंधित गावचे तलाठी, कोतवाल, डी सीएस साठी नियुक्त सहाय्यक, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) यांची मदत घेऊन आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणीद्वारे पीक नोंदणी न केल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा कोरा राहणार असून, नंतर तो भरता येणार नाही. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदाने व विविध लाभ मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेषतः अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पीक विमा मिळण्यासाठी ७/१२ वर अचूक पीक नोंद असणे अत्यावश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर, सर्व शेतकरी बांधवांनी २४ जानेवारी २०२६ पूर्वी अनिवार्यपणे आपल्या पिकांची ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
