एमआयडीसीतील शेतमाल खरेदीदारांवर बाजार समितीचा दणकानियमबाह्य व्यवहारांप्रकरणी ‘अ वर्ग’ व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित
निलेश कोल्हे
चिखली:- एम.आय.डी.सी. परिसरात नियमांचे उल्लंघन करून खाजगी गोडावूनवर शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने कठोर कारवाई करत ‘अ वर्ग’ (खरेदीदार) परवाने निलंबित केले आहेत. बाजार फी व सुपरव्हिजन फीचा भरणा टाळून शासन व बाजार समितीचे आर्थिक नुकसान करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य यार्डातील व्यापारी/अडते कल्याणकारी बहुउद्देशीय असोसिएशन, चिखली यांनी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अवैध शेतमाल खरेदी व्यवहारांबाबत बाजार समिती व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलढाणा यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. त्याची दखल घेत मा. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून खाजगी गोडावूनवरील खरेदी-विक्रीचा संपूर्ण रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र संबंधित व्यापाऱ्यांनी ना कोणतेही रेकॉर्ड सादर केले, ना खुलासा दिला. त्यामुळे बाजार समितीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारक ‘अ वर्ग’ व्यापाऱ्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने शेतकरी बांधवांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. एमआयडीसी परिसरातील संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित असल्याने अशा व्यापाऱ्यांशी शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत. असे व्यवहार केल्यास त्याची जबाबदारी बाजार समिती स्वीकारणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केवळ बाजार समितीच्या अधिकृत यार्डातच विक्रीस आणावा, असेही सांगण्यात आले आहे.
तसेच निलंबन कालावधीत संबंधित व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केल्यास ती खरेदी अवैध ठरेल व त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. याशिवाय राष्ट्रीयकृत बँका व पतसंस्थांनी देखील निलंबित व्यापाऱ्यांशी बाजार समितीच्या परवान्याच्या आधारे कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, अन्यथा संबंधित बँक अथवा पतसंस्था स्वतः जबाबदार राहतील, असेही बाजार समितीने स्पष्ट केले आहे.
या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील अवैध शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारांवर आळा बसणार असून बाजार समितीच्या नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
२८ परवाना धारक व्यापाऱ्यांवर कारवाई
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने एमआयडीसी परिसरात नियमबाह्य पद्धतीने शेतमाल खरेदी करणाऱ्या एकूण २८ परवाना धारक ‘अ वर्ग’ व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. बाजार फी व सुपरव्हिजन फी न भरता खरेदी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, निलंबन काळात कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार केल्यास ते अवैध ठरणार आहेत, असा इशारा बाजार समिती प्रशासनाने दिला आहे.
