विमान अपघातात अजित पवारांचं निधन…..
पुणे :- २८ जानेवारी २०२६ । महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना आज सकाळी घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयानक होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असून याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी विमानाने रवाना झाले होते. एका छोट्या विमाने अजित पवार नेहमीच प्रवास करत असतात.
आज देखील छोट्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सेक्योरिटी आणि पीए देखील विमानात होते. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
