दिव्य सेवा प्रकल्पाचा उत्सव नात्यांचा अनोखा जन्मदिवस कार्यक्रम उत्साहात साजरा,काकडे दांपत्यांनी माणसात देव शोधत मनोयात्री माऊलींना मायेची ऊब दिली :अमोल गायकवाड
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) समाजात वाढत्या स्वार्थी प्रवृत्तींच्या काळात माणुसकी जपणारे हात दुर्मिळ होत चालले असतांना दिव्य सेवा प्रकल्प हे मानवतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. या प्रकल्पाच्या कार्याची पाहणी केल्यानंतर दिव्य सेवा प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे व ज्योतीताई काकडे यांनी माणसात देव शोधला आहे, याची प्रचिती येते.त्यांच्या कार्यातून मनोयात्रींना मायेची ऊब मिळत असून दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत ७८२ पेक्षा अधिक मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले असून सध्या १०० हून अधिक मनोरुग्ण वैद्यकीय उपचार घेत आहेत, हे दखलपात्र असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले.
बेघर बेवारस निराधार मनोयात्री यांचा सामूहिक वाढदिवस ‘उत्सव नात्यांचा’ हा कार्यक्रम मंगळवार 27 जानेवारी रोजी दिव्य सेवा प्रकल्पात मोठ्या थाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.स्नेहाताई भंडारे तर प्रमुख उपस्थितीमध्ये अमृता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई पाखरे, शाहिनाताई पठाण ,प्रज्ञाताई लांजेवार, वैशालीताई तायडे, ज्योतीताई धंदर, संस्कृती अर्बनचे निलेश गोरे, अमोल भिल्लारी, पत्रकार राजेश डीडोळकर, वामन राठोड, प्रा.ज्ञानेश्वर बावणे, त्र्यंबक टेकाळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अमोल गायकवाड सर म्हणाले की,
समाजाने अनेकदा नाकारलेल्या या मनोयात्रींना काकडे दांपत्य आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपतात, त्यांची काळजी घेतात आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देतात. देव मंदिरात नसून माणसात आहे, याची जाणीव काकडे दांपत्यांचे कार्य पाहिल्यावर होते.मानसिक आजारग्रस्तांना उपचार, आधार, निवारा आणि प्रेम देत त्यांचे पुनर्वसन करण्याचे अवघड पण पवित्र कार्य दिव्य सेवा प्रकल्पातून सुरू असून हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड सर यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत गीत गायनाने मनोयात्रींचा उत्साह वाढविला.
अडचणींवर मात करत सेवा करणे सुरू आहे : अशोक काकडे
दिव्यांग व मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या दिव्य सेवा प्रकल्पाच्या कार्याचा आढावा देतांना प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे यांनी मनोयात्रींचा सांभाळ करताना येणाऱ्या विविध अडचणींचा उल्लेख केला.ते म्हणाले की, मानसिक आजारग्रस्त व्यक्तींची काळजी घेणे हे केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित नसून त्यांच्या वर्तनातील बदल, भावनिक चढ-उतार, कुटुंबीयांची अनुपस्थिती आणि समाजातील गैरसमज अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तरीही या सर्व अडचणींवर मात करत प्रकल्पाच्या माध्यमातून मनोयात्रींना आधार, उपचार आणि मायेचे वातावरण देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
मनोयात्रींनी कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने
दिव्य सेवा प्रकल्पातील मनोयात्रींनी यावेळी आपल्या विविध कलागुणांचा सुंदर अविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. वैयक्तिक तसेच सामूहिक नृत्य, गीत गायन यांसह भक्तीमय वातावरणात हनुमान चालीसा पठण आणि प्रार्थना सादर करण्यात आली.या सादरीकरणातून मनोयात्रींच्या अंगी दडलेली कला, आत्मविश्वास आणि सकारात्मक उर्जा स्पष्टपणे जाणवली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहन दिले…
