धक्कादायक ! बुलढाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम स्थळी चिमुरडीवर अत्याचार
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम स्थळी एका २५ वर्षीय नराधमाने ५ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने पीडितेचे अपहरण करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला रेल्वे स्थानकावरून बेड्या ठोकल्या.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचे कंत्राट ‘सॅम इंडिया’ कंपनीकडे आहे. २८ जानेवारी रोजी दुपारी, आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५, रा. पलामू, झारखंड) याने परिसरात एकटी असलेल्या चिमुरडीला फूस लावून जवळच्या झोपडीत नेले. तिथे त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या अत्याचारात पीडितेला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.घटनेनंतर घाबरलेल्या आरोपीने पीडितेला उपचारासाठी नेण्याऐवजी तिचे अपहरण केले आणि तिला घेऊन मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. इकडे मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पालकांनी तक्रार केली. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी केला. रेल्वे स्थानकावर राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केली आणि पीडित मुलीची सुटका केली. आरोपी संतोषकडे आधार कार्ड किंवा कोणतेही अधिकृत ओळखपत्र नव्हते. परप्रांतीय मजुरांची कोणतीही पोलीस पडताळणी कंत्राटदार कंपनीने केली नसल्याचे उघड झाले आहे.पीडितेची प्रकृती चिंताजनकअति रक्तस्रावामुळे पीडितेची प्रकृती खालावली होती. स्थानिक रुग्णालयातील उपचारानंतर तिला अधिक उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.
