देऊळगाव कुंडपाळ रस्ता भ्रष्टाचार प्रकरणः डॉ. संजय रायमुलकरांच्या मध्यस्थीने ४० महिलांचे उपोषण स्थगित….
लोणार ( रघुनाथ आघाव लोणार) देऊळगाव कुंडपाळ (ता. लोणार) येथील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अपहार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्या सौ. नंदाबाई प्रमेश्वर राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजातील सुमारे ४० महिलांनी लोणार पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार मा. डॉ. संजयजी रायमुलकर साहेब यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर प्रशासनाने चौकशी व कारवाईचे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले.तांडा वस्ती सुधार योजनेतून बंजारा वस्तीत अंतर्गत रस्त्यांसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला. रस्त्याची आवश्यक जाडी न ठेवता, सिमेंट काँक्रीटचे प्रमाण कमी करून तसेच मुरूम व इतर साहित्याचा वापर नियमबाह्य पद्धतीने केल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला. काही ठिकाणी रस्ता आधीच उखडू लागल्याचेही निदर्शनास आणून दिले.काम पूर्ण झाल्याचे दाखवून संपूर्ण निधी उचलण्यात आल्याचा आरोप करत, ठेकेदार व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला. या प्रकरणाची १५ दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली होती.आंदोलनाची दखल घेत माजी आमदार मा. डॉ. संजयजी रायमुलकर साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यांनी मा. उमेशजी देशमुख साहेब (गटविकास अधिकारी, लोणार), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी केली. शासकीय निधीच्या अपहारासारख्या गंभीर प्रकरणात कोणालाही पाठीशी घालले जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.प्रशासनाकडून चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आपले उपोषण स्थगित केले.यावेळी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या सह शिवसेना जिल्हाप्रमुख बळीभाऊ मापारी, उबाठा शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक गोपाल सिंग बच्छिरे, श्री गजानन जाधव सर, श्री पांडुभाऊ सरकटे, श्री गजानन मापारी, श्री राजुभाऊ बुधवत, श्री विजय सानप, श्री संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव, श्री रामेश्वर सि.आघाव, श्री विजय चव्हाण (सरपंच), श्री समाधान राठोड (सरपंच), श्री भाग्यवंत (सरपंच), श्री बाबुसिंग जाधव, श्री रोहिदास जाधव, डॉ. लक्ष्मण जाधव, श्री लिंबाजी राठोड (सरपंच), श्री दशरथ राठोड (सरपंच), श्री शेषराव डोंगरे (सरपंच), श्री अमोल सरकटे, श्री सुनील नरवाडे, श्री ज्ञानेश्वर गाढवे, श्री परमेश्वर राठोड, श्री राजुभाऊ इंगळे, श्री सुदन अंभोरे सर, सौ. तारामती जायभाये, ॲड. शिवाजी सानप, श्री संतोष सरकटे, श्री श्यामभाऊ राऊत, श्री महिपत वाणी, मा. उमेशजी देशमुख साहेब (गटविकास अधिकारी, लोणार), मा. रविभाऊ मापारी (अधिक्षक), मा. मुंढे साहेब, लक्ष्मण जायभाये (ग्रामसेवक) तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.दरम्यान, तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्या महिलांनी दिला असून, तांडा वस्ती सुधार योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
