लोणार येथे कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून; बनावट औषधीचा 29 हजारांचा मुद्देमाल जप्तदुकानदारावर गुन्हा दाखल
लोणार (यासीन शेख) बनावट कृषी औषधांच्या विक्रीचा गंभीर प्रकार लोणार येथे उघडकीस आला आहे. अरिहंत ऍग्रो कृषी सेवा केंद्र, लोणार येथे Syngenta कंपनीच्या नावाने बनावट Isabion (1 लिटर) या औषधांची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत २९ हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित दुकानदाराविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957 (सुधारित 1984 व 1994) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश तानाजी पिसाळ (वय 34), व्यवसाय टू बडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, रा. बीडी कामगार नगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सचिन सुभाषचंद्र बोरा (वय 47), रा. जैन मंदिर परिसर, लोणार, ता. लोणार याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिहंत ऍग्रो कृषी सेवा केंद्र येथे Syngenta कंपनीचे Isabion औषध बनावट स्वरूपात पॅकेजिंग करून विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, शासकीय पंच व कृषी अधिकारी यांच्यासह नमूद दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान दुकानातील रॅकमधून तसेच पाठीमागील स्टोअर रूममधून Isabion 1 लिटर Syngenta कंपनीच्या 16 सिलबंद बॉटल्स मिळून आल्या. प्रत्येकी किंमत ₹1,813 प्रमाणे एकूण ₹29,008 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या बॉटल्सची तपासणी करताना त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मूळ बॉटलच्या तुलनेत बनावट बॉटलवरील लोगोचा रंग फिक्कट हिरवा आढळून आला, तर मूळ बॉटलवर गडद हिरव्या रंगाचा लोगो आहे. तसेच इंग्रजीतील GTIN, GTIN नंबरमधील “2” ऐवजी “02”, सिरीयल नंबरमधील फॉन्टमधील फरक, तसेच बॉटलच्या झाकणाच्या रंगातही तफावत आढळून आली. या बनावट औषधांची विक्री करून आरोपीने Syngenta कंपनीची प्रतिमा मलीन केली, शासनाच्या महसुलाचे नुकसान केले तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक व शेतीविषयक मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण केली, असा आरोप फिर्यादीने तोंडी रिपोर्टमध्ये केला आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.या कारवाईमुळे लोणार परिसरात बनावट कृषी औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी औषधे खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
