राष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण झळक गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत महाराणा तायक्वांदो कराटे अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व; थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
लोणार( यासीन शेख )गोव्यातील मडगाव येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विदर्भाच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी मल्टी पर्पज हॉल, मडगाव (गोवा) येथे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेचे आयोजन फिफ्ट इंडिया, नीति आयोग, महाराष्ट्र इंडिया गव्हर्नमेंट असोसिएशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराणा तायक्वांदो कराटे अकॅडमी, लोणार येथील विद्यार्थ्यांनी आपल्या-आपल्या गटात दमदार खेळाचे प्रदर्शन करत तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिशा आदी राज्यांतील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांवर मात करून गोल्ड मेडल पटकावले. सुवर्णपदक विजेते खेळाडू ज्ञानेश अनिल काळे, मैथिली अनिल काळे, समीक्षा जितेंद्र झिणे, भूमिका उमेश सानप, तेजस भगवान जाधव, एकांतकुमार संतोष राठोड, सोहम संतोष जाधव, सुनील भगवान आढे, सोमनाथ सतीश बोडखे, पूनम योगेश भालतिलक, मेहूल रविंद्र ठाकूर, साची मंगेश नागापूरे.या सर्व खेळाडूंनी तांत्रिक कौशल्य, वेगवान हालचाली, अचूक किक-पंच व शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर परीक्षकांची विशेष दाद मिळवली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे लोणार तालुका, बुलढाणा जिल्हा तसेच संपूर्ण विदर्भाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.या यशाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची मे महिन्यात थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे खेळाडू आता देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या यशामागे मुख्य कराटे प्रशिक्षक संतोष सखाराम जाधव, कराटे प्रशिक्षक सुनील भगवान आढे, कराटे प्रशिक्षिका चंचल वासुदेव दाते तसेच कराटे प्रशिक्षक हार्षदिप महिंद्र आठवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कठोर प्रशिक्षणामुळेच हे यश मिळाल्याची भावना पालक व क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली. या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरांतून खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे व अकॅडमीचे अभिनंदन होत असून, भविष्यातही लोणारचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचा झेंडा फडकावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
