“नादच खुळा ! कोलवडच्या चिमुरड्यांनी पुण्यात गाजवलं मैदान; राज्यस्तरावर बुलढाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.”
बुलढाणा बुलढाणा माझा न्युज )सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण पुणे यांच्या वतीने पुरंदर (जि. पुणे) येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा व कला अविष्कार स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील ‘अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, कोलवड’ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ज्या चार प्रकारांत सहभाग नोंदवला, त्या चारही इव्हेंटमध्ये यश संपादन करून शाळेच्या लौकिकात भर घातली आहे.या स्पर्धेमध्ये राजभरातील विविध निवासी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कोलवड शाळेच्या खालील विद्यार्थ्यांनी बाजी मारली:धावणे (१७ वर्षे गट): धिरज शेगोकार याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.
धावणे (१७ वर्षे गट): मोहन मिसाळ याने २०० मीटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
धावणे (१४ वर्षे गट): आदित्य गाडेकर याने तृतीय क्रमांक मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली.
लोकनृत्य स्पर्धाः कलेच्या क्षेत्रातही शाळेने छाप पाडली असून, लोकनृत्य स्पर्धेत सहभागी संघाने द्वितीय क्रमांक पटकावून राज्याचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अमरावती विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, बुलढाण्याचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत आणि शाळेचे मुख्याध्यापक संतोष पहुरकर यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
या यशामागे क्रीडा विभाग प्रमुख श्रीकृष्ण शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या मोरे यांच्यासह पवन फोलाने, ज्ञानेश्वर सावळे. विनोद भेलके. रविंद डोंगरदिवे आणि नितीन इंगळे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
“शाळेतील विद्यार्थी केवळ चार इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते आणि त्या चारही प्रकारात त्यांनी बक्षिसे मिळवली, ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.”
या दैदिप्यमान यशामुळे कोलवड निवासी शाळेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीला पुन्हा एकदा सलाम केला जात आहे.
