चिखलीत दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; सरंबा येथील तरुणाचा मृत्यू, दोन गंभीर
चिखली ( बुलढाणा माझा न्युज )आजच्या तरुणाईमध्ये वाढलेली भरधाव वेगाची क्रेझ जीवघेणी ठरत आहे. चिखली शहरानजीक असलेल्या देऊळगाव राजा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एका २७ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, स्वप्निल दिनकर चेके (वय २७, रा. सरंबा, ता. देऊळगाव राजा) हा आपला मित्र शंकर प्रसाद (रा. उत्तर प्रदेश) याच्यासह दुचाकीने (क्र. BM-28-5870) सरंबा गावाकडे जात होता. ५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी, देऊळगाव राजा रोडवरील मीरा लॉन्ससमोर समोरून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीने (क्र. MH-28-Z-8436) स्वप्निलच्या गाडीला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. स्वप्निल चेके हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वप्निलचा मित्र शंकर प्रसाद आणि धडक देणारा दुचाकी चालक हे दोन्ही या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करणे केवळ दंड टाळण्यासाठी नसून, स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी आहे. भरधाव वेग क्षणाचा आनंद देऊ शकतो, पण आयुष्यभराचे दुःख देऊन जातो.
