श्री गजानन महाराज संस्थेचा १४८ वा प्रगटदिन उत्सव
सिंदखेडराजा (अनिल दराडे )श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव येथे श्रींचा १४८ वा प्रगटदिन उत्सव दि. ०२/०२/२०२६ ते ०८/०२/२०२६ पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दररोज सकाळी ६.०० ते ६.४५ काकडा, ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले.उत्सवात ह.भ.प. राम बुवा डोंगरे, जाटनांदुर, ह.भ.प. मनोज बुवा कुलकर्णी पिंपळा, ह.भ.प. अनिरुद्ध बुवा क्षिरसागर, सावरगांव मा., ह.भ.प. बळीराम बुवा दोंड, शिरवर, ह.भ.प. संभाजी बुवा मेहुणकर, धाराशिव, ह.भ.प. मयुर बुवा बोडखे, श्री क्षेत्र देहू, ह.भ.प. श्रीहरी बुवा वैष्णव, जालना आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले.श्री महारुद्र स्वाहाकार यागास माघ वद्य ९ ला प्रारंभ होऊन माघ वद्य ७ ला सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहूती झाली. ‘श्रींच्या प्रागटद्या’ निमित्य श्रीहरी कीर्तन होऊन कार्यक्रम संपन्न झाला.यावर्षी श्री प्रगटदिन उत्सवात श्रींचे सेवेत १०२९ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण ८८ नवीन दिंड्यांना १० टाळ, १ वीणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाड्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या.जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्ती करीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था व प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली.उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा प्रगटदिन उत्सव संपन्न होऊन २,३४,२४० भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे.
