चिखली तालुक्यातील भरोसा येथे लांडग्यांचा थरार; ८ शेळ्या-बोकड ठार, शेतकरी संकटात,दीड लाखांचे नुकसान; वनविभागाकडे तातडीने मदतीची मागणी
चिखली (एकनाथ माळेकर)चिखली तालुक्यातील मौजे भरोसा येथे लांडग्यांच्या कळपाने सोमवारी मध्यरात्री धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्य गोठ्यावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात दोन बकऱ्या आणि सहा बोकड ठार झाले असून, एका गाईच्या वासरालाही लांडग्यांनी गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्याचे सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.भरोसा येथील रहिवासी शेतकरी समाधान ज्ञानबा थुटटे यांचा अंचरवाडी रस्त्यावर शेतात गोठा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी मोठ्या कष्टाने शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. ९ फेब्रुवारी रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी आपली जनावरे गोठ्यात बांधली होती. मात्र, मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास लांडग्यांच्या कळपाने गोठ्यावर अचानक हल्ला केला. यामध्ये थुटटे यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या ८ शेळ्या-बोकडांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास वानखेडे, वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक गजानन पोटे आणि तलाठी मगर मॅडम यांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.वनविभागाचे आश्वासनवनरक्षक गजानन पोटे यांनी ‘दैनिक महाभूमी’शी बोलताना सांगितले की, “वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यासाठी शासनाचे नियम आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रीतसर अर्ज सादर करावा. आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.”शेतकऱ्याचा टाहोः आधीच शेती अडचणीत असताना जोडधंद्यावर लांडग्यांनी घाला घातल्यामुळे समाधान थुटटे यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने कोणत्याही तांत्रिक त्रुटी न काढता तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
