अधिकाऱ्याची गाडी घासली, मग जनतेचे काय? चिखली तालुक्यातील ‘ काळोना’ ग्रामस्थांचा संताप; अखेर आश्वासनानंतर उपोषण मागे

IMG-20260210-WA0039

बुलढाणा (एकनाथ माळेकर)एकीकडे देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे, शहरात मेट्रो आणि समृद्धी महामार्ग धावत आहेत, तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील काळोना हे गाव आजही नकाशावर येण्यासाठी संघर्ष करत आहे. “एका दिवसासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या गाडीचे रस्ते नसल्यामुळे हाल होत असतील, तर रोज खड्ड्यातून चालणाऱ्या सामान्य जनतेने जगायचे कसे?” असा संतप्त सवाल काळोना ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.चिखली तालुक्यातील आणि सिंदखेडराजा मतदारसंघातील काळोना गाव अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि विशाल थुट्टे यांच्या नेतृत्वाखाली ९ फेब्रुवारी २०२६ रोजी काळोना ग्रामस्थांनी अंढेरा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. विशेष म्हणजे, उपोषण स्थळी येताना अंढेरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांचे वाहन खराब रस्त्यामुळे खालून घासले गेले. ही घटना गावच्या दयनीय अवस्थेचे जिवंत उदाहरण ठरली.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्याः

१. काळोना गाव अधिकृतपणे महसूल पटलावर (नकाशावर) घेण्यात यावे.

२. गावाला जोडणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.

3. गावच्या स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न निकाली काढावा.

४. खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी गावाला मिळवून द्यावे.

उपोषणाची दखल घेत सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांच्या प्रतिनिधींनी रस्ते आणि स्मशानभूमीसाठी निधी देण्याचे कबूल केले. तसेच, जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.स्थळावर चिखलीचे तहसीलदार गायकवाड, अंढेरा ठाणेदार शक्करगे, पाटबंधारे विभागाचे पांडे साहेब आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे चेके साहेब उपस्थित होते. प्रशासनाने सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवत काम पूर्ण करण्यासाठी वेळ मागितल्याने, पहिल्याच दिवशी लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.या उपोषणात संतोष पाटील भुतेकर, विशाल थुट्टे यांच्यासह गणेश उसर, गजानन उसर, समाधान उसर, मधुकर उसर आणि असंख्य महिला-पुरुष ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव जावळे, विष्णू पाटील घुबे, सतीश पाटील भुतेकर व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.प्रशासकीय आश्वासन कागदावरच राहते की प्रत्यक्षात उतरते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

You may have missed

error: Content is protected !!