लोणार-सिंदखेडराजा परिसरात जिओचे नेटवर्क ‘डेड’; आठ दिवसांपासून नागरिक आणि विद्यार्थी वेठीस !मोबाईल सेवा कोलमडल्याने ऑनलाईन व्यवहार आणि बँकिंग सेवा ठप्प; त्रस्त नागरिक आता ‘सिम पोर्ट’ करण्याच्या तयारीत.
लोणार/सिंदखेडराजा ( रघुनाथ आघाव)लोणार व सिंदखेडराजा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रिलायन्स जिओ (Jio) कंपनीचे मोबाईल नेटवर्क अक्षरशः कोलमडले असून, ग्रामीण भागात तर ही समस्या गेल्या आठ दिवसांपासून कायम आहे. नेटवर्क नसल्याने दैनंदिन व्यवहारांपासून ते शासकीय कामकाजापर्यंत सर्वच यंत्रणा विस्कळीत झाल्या असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.लोणार तालुक्यातील वझर, आघाव, गुंजखेड यांसारख्या ग्रामीण भागांत परिस्थिती अधिक गंभीर आहे. येथे गेल्या आठ दिवसांपासून मोबाईलवर ‘नो सर्व्हिस’चा संदेश दिसत आहे. कॉल लागत नाहीत आणि इंटरनेटचा वेग शून्य झाल्यामुळे हा भाग जगापासून तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.आजचे युग हे डिजिटल व्यवहारांचे आहे, मात्र नेटवर्कअभावी या संकल्पनेला हरताळ फासला जात आहे:बँकिंग सेवा: यूपीआय (UPI) आणि नेट बँकिंग बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे हजारो रुपयांचे व्यवहार अडकले आहेत.शिक्षणः विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य डाउनलोड करता येत नाहीये, ज्यामुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.शासकीय कामे: महा-ई-सेवा केंद्र आणि शासकीय संकेतस्थळांवर लॉगिन होत नसल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांना कागदपत्रांसाठी ताटकळावे लागत आहे.”आम्ही दर महिन्याला वेळेवर रिचार्ज करतो, पण सेवा मात्र मिळत नाही. ग्राहकांकडे रोख रक्कम नसते आणि नेटवर्क अभावी ऑनलाईन पेमेंट होत नाही, यामुळे आमचा व्यापार अडचणीत आला आहे.”वारंवार तक्रारी करूनही जिओ कंपनीकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने, संतप्त नागरिकांनी आता सामूहिकरीत्या ‘सिम पोर्ट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. जर येत्या २४ तासांत सेवा पूर्ववत झाली नाही, तर इतर कंपन्यांच्या नेटवर्ककडे वळण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक त्रस्त असतानाही स्थानिक प्रशासनाने अद्याप कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधलेला नाही, अशी चर्चा परिसरात आहे. संबंधित कंपनीने तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
