पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण; धावण्याचा सराव करताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू….

Screenshot_2026-02-14-18-13-21-52_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

मेहकर (बुलढाणा माझा न्युज )आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सराव करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाचा धावताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मेहकर तालुक्यातील सारशिव येथे घडली आहे. दीपक रामदास जाधव असे या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे की दीपक हा मुंबई पोलीस दलात भरती होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कसून तयारी करत होता. १२ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजेच्या सुमारास तो सारशिव फाटा ते मंगरूळ नवघरे या मार्गावर धावण्याचा सराव (रनिंग) करत होता. सराव सुरू असतानाच अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. काही कळण्याच्या आतच तो रस्त्यावर कोसळला.दीपक कोसळल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी आणि इतर सराव करणाऱ्या तरुणांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेतली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला ‘मृत’ घोषित केले. धावताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.दीपक हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र, नियतीने हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच हिरावून नेले. तरुण मुलाच्या अशा जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सारशिव गावावर शोककळा पसरली आहे.

You may have missed

error: Content is protected !!