जळगांव (पिंपळगांव बु.) येथे महाशिवरात्री निमित्त सप्ताहाचे आयोजन….

Screenshot_2026-02-14-18-23-59-84_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) जळगांव (पिंपळगांव बु.), ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा श्री सद्‌गुरू विश्वनाथ महाराज (आळंद) यांच्या कृपाआशीर्वादाने व श्री ओलांडेश्वर महादेव संस्थान यांच्या वतीने यंदा महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सप्ताहास सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ (माघ कृ. ८) रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. या सप्ताहाचे यंदाचे हे २७ वे वर्ष असून सांगता सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ (माघ कृ. १४) रोजी होणार आहे.
या सप्ताहानिमित्त दररोज पहाटे काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गुरूचरित्र वाचन, शिवपुराण कथा, हरिपाठ तसेच रात्री कीर्तन व जागराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकडा व ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. रामकिसनराव वाघ यांच्याकडे असून गुरूचरित्र व शिवपुराण कार्यक्रम ह.भ.प. आघाव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. शिवपुराण कथा नेतृत्व ह.भ.प. श्रीकृष्ण मोरे महाराज सावंगीकर हे करीत आहेत.
सप्ताहात विविध मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. दि. १० फेब्रुवारी रोजी ह.भ.प. गोपाळ महाराज मुसळे, दि. ११ फेब्रुवारी रोजी प.पू. दिगंबर स्वामी अमोलानंदजी महाराज गिरी, दि. १२ फेब्रुवारी रोजी महंत राधाताई महाराज आईसाहेब, दि. १३ फेब्रुवारी रोजी प्रवक्त्या सौ. जनाताई डोंगरे, दि. १४ फेब्रुवारी रोजी महंत पांडुरंग महाराज, दि. १५ फेब्रुवारी रोजी युवा कीर्तनकार ह.भ.प. प्रदीप महाराज कायदे यांची कीर्तने होणार आहेत. सप्ताहाची सांगता दि. १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. भागवताचार्य श्रीकृष्ण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विविध गावांमध्ये जागर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!