18 फेब्रुवारी पासून होणाऱ्या राज्यस्तरीय भूमी अभिलेख विभागाच्या काम बंद आंदोलनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात…
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) भूमि अभिलेख च्या इतिहासात राज्यातील सर्व भूमि अभिलेख चे कर्मचारी भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या एकाच छताखाली भूमि अभिलेख विभागाचे सर्व कर्मचारी आंदोलनासाठी सज्जभूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आढावा सभा घेण्यात आल्या. भूमि अभिलेख विभाग बुलढाणा जिल्हा यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शेगाव येथे विभागस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी पूर्ण अमरावती विभागामधून सर्व भूमि अभिलेख विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक हे विभागाचे कणा मानले जातात. जमिनीची मोजणी करण्यापासून ते शासकीय दस्तऐवज अद्ययावत ठेवण्यापर्यंत त्यांची कामे अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाची असतात.भुकरमापक पदाची शैक्षणिक पात्रता ही अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका करण्यात आली असून या विभागातील सर्व कामे हे तांत्रिक स्वरूपाचीच आहेत. इतर विभागातील खासकरून वन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील भुकरमापक पदांवरील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन देण्यात येत असून भुमिअभिलेख विभागांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना हे लिपिक वर्गीय वेतन देण्यात येत आहे. मा. न्याधिकरणाने (मॅट ) सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन ही शासनाने अजूनही या कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू केली नाही, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे, १८ फेब्रुवारी 2026 रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत, २० फेब्रुवारी 2026 पासून मोजणी काम बंद २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक रजा २७ फेब्रुवारी रोजी पुण्यात जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून संपूर्ण राज्यात बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.या आजच्या सभेसाठी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये, श्री. रमेश सरकटे, गजानन इंगळे, श्रीमती दीपाली मुरकुटे, किशोर इंगळे, विजय चव्हाण, अभय पाटील, गणेश सुरपाटणे, अनिल दांडगे तसेच सर्व बुलढाणा जिल्ह्यातील भूमि अभिलेख विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
