वळती ग्रामपंचायतीचा ‘विकास’ फक्त कागदावरच? पाच वर्षांतील कोट्यवधींच्या निधीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात!ग्रामस्थांचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप; सखोल चौकशीसाठी बी.डी.ओ. कडे धाव, ग्रामस्थ आक्रमक….
चिखली ( एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी ):जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वळती ग्रामपंचायतीचा मागील पाच वर्षांतील कारभार सध्या गंभीर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गावाच्या विकासासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका मुरला कुठे? असा संतप्त सवाल आता वळतीचे ग्रामस्थ विचारत आहेत. यासंदर्भात सजग नागरिकांनी चिखलीचे गटविकास अधिकारी (BDO) यांना लेखी निवेदन देऊन ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची आणि विकासकामांची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.ग्रामस्थांनी ‘ई-ग्रामस्वराज’ आणि ‘मेरी पंचायत’ पोर्टलवरील आकडेवारीचा दाखला देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात म्हटले आहे की, साध्या कामांसाठी जिथे काही हजार रुपये अपेक्षित होते, तिथे लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. अनेक कामे तर केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवून निधी हडपल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामपंचायत शौचालय दुरुस्ती आणि देखभालीवर मोठा खर्च दाखवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात गावात अशी कोणतीही दुरुस्ती झालेली दिसत नाही.सर्वात मोठा आक्षेप ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत राबवलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेवर घेण्यात आला आहे. जुन्याच योजनांमधील कामे नवीन दाखवून आणि तांत्रिक त्रुटी ठेवून हा प्रकल्प राबवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही गावाला शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.ग्रामस्थांच्या मते, गावात झालेली बहुतांश कामे ही आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या विकास निधीतून झाली आहेत, तसे फलकही गावात ठिकठिकाणी आहेत. मग ग्रामपंचायतीला मिळणारा १४ वा आणि १५ वा वित्त आयोगाचा निधी, मनरेगाचा पैसा आणि इतर योजनांचा निधी गेला कुठे? असा रोकडा सवाल आता विचारला जात आहे.तक्रारीतील प्रमुख गंभीर मुद्दे:बोगस ग्रामसभा: ग्रामसभा प्रत्यक्ष न घेता केवळ कागदावरच प्रोसिडिंग लिहून निर्णय घेतल्याचा संशय.साहित्य खरेदीत घोळ: कचरा गाडी, स्प्रिंकलर सेट, पाईपलाईन साहित्य आणि शोषखड्डे योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप.प्रशासकीय अनास्था: ग्रामसेवक नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबत आहेत.बोगस लाभार्थी: मनरेगा आणि विहीर अनुदान योजनेत चुकीच्या पद्धतीने निधी वाटप झाल्याची शक्यता.या प्रकरणाची निष्पक्ष आणि तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांवर अद्याप ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.”गावाचा विकास हा पारदर्शक असायला हवा. पोर्टलवर दिसणारे आकडे आणि गावातील प्रत्यक्ष स्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”— तक्रारदार ग्रामस्थ, वळती.
