हत्ता परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री ११ शेतकऱ्यांचे मोटार स्टार्टर व ऑटो स्विच लंपास…..
लोणार (जयजीत आडे):तालुक्यातील हत्ता गावातील शिवारात अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत ११ शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारपंपचे स्टार्टर, ऑटो स्विच आणि इतर साहित्याची चोरी केली आहे. ही घटना दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. ऐन रब्बी हंगामात सिंचनाचे साहित्य चोरीला गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.सध्या शेतामध्ये गहू, हरभरा आणि शेडनेटमधील पिकांना पाणी देण्याचे काम जोमाने सुरू आहे. हत्ता येथील शेतकरी श्री. अर्जुन बाबुराव गावंडे हे नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांना विहिरीवरील पेटीत असलेले मोटार स्टार्टर आणि ऑटो स्विच गायब असल्याचे दिसले. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे विचारणा केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. केवळ गावंडेच नव्हे, तर परिसरातील एकूण ११ शेतकऱ्यांचे स्टार्टर, ऑटो स्विच आणि शेतीसाठी लागणारे आवश्यक पान्हे चोरट्यांनी लंपास केले होते.मिळालेल्या माहितीनुसार, या चोरीत शेतकऱ्यांचे अंदाजे ५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. पिकांना पाणी देण्याची वेळ असतानाच यंत्रणा निकामी झाल्यामुळे गव्हासारख्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्री. अर्जुन गावंडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध BNS कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोणार पोलीस स्टेशनचे पी.आय. सदगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गजानन दराडे, श्री. रिंढे आणि श्री. प्रदीप पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. परिसरात वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
