उमेदवारांच्या सोयीसाठी प्रशासन ‘सज्ज’; माणुसकी आणि पारदर्शकतेचा अनोखा मेळ!
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) बुलढाणा जिल्ह्यात सध्या पोलीस भरतीचा रणसंग्राम सुरू असून, या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या शेकडो तरुण-तरुणींच्या सोयीसाठी जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, केवळ कडक शिस्तच नाही तर उमेदवारांच्या आरोग्याची आणि निवासाची विशेष काळजी घेऊन प्रशासनाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे.बुलढाणा जिल्हा पोलीस आस्थापनेवरील एकूण १६२ पदांसाठी (१४८ पोलीस शिपाई व १४ चालक पोलीस शिपाई) ही भरती प्रक्रिया १२ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस कवायत मैदानावर सुरू झाली आहे. शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचण्यांसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.मैदानावरील कडाक्याचे ऊन आणि शारीरिक कष्ट लक्षात घेता, प्रशासनाने खालील विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत:आरोग्य सुरक्षा: मैदानावरच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास तैनात.ऊर्जेसाठी तरतूद: थकवा जाणवू नये म्हणून उमेदवारांना ORS पाकिटे, अल्पोपहार आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था.तांत्रिक मदत: जे उमेदवार फोटो विसरले आहेत, त्यांच्यासाठी मैदानावरच रंगीत फोटो आणि कागदपत्रांच्या झेरॉक्सची सोय.तक्रार निवारण: प्रक्रियेत काही अडचण आल्यास मैदानावरच स्वतंत्र ‘तक्रार निवारण कक्ष’ कार्यरत.भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे:संपूर्ण मैदानी चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग.डिजिटल आणि ऑटोमेटेड पद्धतीने मोजमाप.निकाल त्वरित जाहीर करण्याची पारदर्शक पद्धत.प्रशासनाचे आवाहन: “जर कोणी भरतीचे आमिष दाखवून भ्रष्टाचाराचा प्रयत्न करत असेल, तर तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. केवळ गुणवत्तेवरच निवड होईल,” असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. श्रेणीक लोढा आणि श्री. अमोल गायकवाड यांच्यासह १५ पोलीस निरीक्षक आणि ४२१ पोलीस अंमलदारांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
