आरोग्य सेवेत बुलढाणा जिल्ह्याचा डंका; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांना ‘राज्यस्तरीय आरोग्य रत्न’ पुरस्कार…..​

Oplus_131072

Oplus_131072

मुंबई/बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज): सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांना महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६” प्रदान करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ. गीते यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.​राज्यात सलग नऊ महिने ‘टॉप थ्री’मध्ये स्थान​बुलढाणा जिल्ह्याने आरोग्य विभागाच्या ‘डीएचओ’ (DHO) मानांकनात एप्रिल ते डिसेंबर २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. सलग नऊ महिने राज्याच्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये तृतीय क्रमांक पटकावून आपली कामगिरी सिद्ध केली. याच यशाबद्दल मा. आमदार प्रकाश आबिटकर व मा. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते डॉ. अमोल गीते यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.​महत्त्वाच्या आरोग्य सेवांचे लोकार्पण​या सोहळ्यादरम्यान आरोग्य क्षेत्रातील काही क्रांतिकारी उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला:​महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम: गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी विशेष सेवा सुरू.​मेनोपॉज क्लिनिक: महिलांच्या आरोग्य समस्यांसाठी राज्यस्तरीय केंद्रांचे लोकार्पण.​महात्मा फुले जन आरोग्य योजना: आता प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) स्तरावरही या योजनेअंतर्गत उपचारांची सुविधा.​सांघिक परिश्रमांचे फळ – डॉ. अमोल गीते​पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. अमोल गीते यांनी या यशाचे श्रेय आपल्या संपूर्ण टीमला दिले. ते म्हणाले, “हा सन्मान म्हणजे संपूर्ण जिल्हा आरोग्य विभागाच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. मा. केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने हे यश संपादन केले आहे. लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आरोग्य सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.”​नेतृत्वाची दखल​डॉ. गीते यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली जिल्ह्यात उत्कृष्ट आरोग्य सेवा व्यवस्थापन, नवकल्पक उपक्रम आणि टीम वर्क यामुळे बुलढाणा जिल्ह्याने राज्यात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे, आगामी काळात राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य सेवांच्या मानांकनातही जिल्ह्याला अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

You may have missed

error: Content is protected !!