सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक मुदत संपल्यानंतर तात्पुरती व्यवस्था; विकासकामांना खंड पडणार नाही – गटविकास अधिकारी बांगर
सिंदखेडराजा (अनिल दराडे) जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून विद्यमान (मावळते) सरपंच यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील एकूण ५१८ ग्रामपंचायतींवर ही तात्पुरती व्यवस्था लागू करण्यात आली आहे. आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.जिल्हा परिषद बुलढाणा (ग्रामपंचायत विभाग) कडून २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आदेश निर्गमित करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम १५१ अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेसाठी उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशांचा तसेच राज्य शासनाच्या अधिसूचनेचा आधार घेण्यात आला आहे.५२५ पैकी ५१८ ग्रामपंचायतींवर कारवाईजानेवारी व फेब्रुवारी २०२६ मध्ये जिल्ह्यातील ५२५ ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. त्यापैकी ७ ग्रामपंचायती वगळून उर्वरित ५१८ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किंवा कमाल सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत ही व्यवस्था लागू राहणार आहे.सिंदखेडराजातील ४३ गावांचा समावेशराजेगांव, गोरेगांव, दुसरबीड, वसंतनगर, सुलजगाव, विझोरा, सायाळा, भोसा, पळसखेड चक्का, धांदरवाडी, वडाळी, कुंबेफळ, जागदरी, खामगांव, दत्तापुर, देउळगांव कोळ, pिपळखुटा, आंबेवाडी, हनवतखेड (म.पा.), कोनाटी, हनवतखेड (महा), महारखेड, वाघोरा, डावरगांव, भंडारी, जळगांव, हिवरा गडलिंग, ढोरव्ही, उमनगाव, कंडारी, साखरखेर्डा, चिंचोली, गारखेड, पिंपळगांव लेंडी, सोनोशी, राहेरी बु., नाईकनगर, शेंदुर्जन, किनगांव राजा, मलकापुर पांग्रा, पिंपरखेड बु., लिंगा आणि पोफळशिवणी या ४३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.उपसरपंच व सदस्यांची समितीप्रशासकांना सहाय्य करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीतील विद्यमान उपसरपंच व सदस्यांची प्रशासक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज आणि विकासकामे ही संबंधित कायदे व शासन आदेशांच्या अधीन राहून समितीच्या सल्ल्याने पार पडणार आहेत.‘कामकाज पूर्ववत गतीने’सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचे कामकाज व सुरू असलेली विकासकामे प्रशासकांच्या माध्यमातून पूर्ववत गतीने सुरू राहतील. ग्रामविकासात कोणताही अडथळा येणार नाही.”तात्काळ अंमलबजावणीमुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक कार्यभार स्वीकारल्याची खातरजमा करून अहवाल सादर करावयाचा आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गावपातळीवरील प्रशासन सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
