सिंदखेडराजा तहसील प्रशासनाचे आवाहन: पीक नुकसानीचे पंचनामा पोर्टल २८ फेब्रुवारीला होणार बंद​उर्वरित बाधित शेतकऱ्यांनी माहिती तात्काळ सादर करावी; मुदतीनंतर मदतीचा लाभ मिळणार नाही​

IMG-20250910-WA0013

सिंदखेडराजा (अनिल दराडे) खरीप हंगाम २०२५ दरम्यान माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासन निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अद्याप ज्या पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती सादर केलेली नाही, अशा उर्वरित खातेदारांनी २८ फेब्रुवारीपर्यंत आपली माहिती तात्काळ सादर करावी, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.​पोर्टल बंद होण्याची भीती खरीप २०२५ च्या सर्व हंगामासाठी व शासन निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी ‘पंचनामा पोर्टल’ दि. २८ फेब्रुवारी २०२६ नंतर बंद होणार आहे. एकदा पोर्टल बंद झाले की, त्यानंतर कोणत्याही नवीन नावांचा समावेश करता येणार नाही. परिणामी, वेळेत माहिती न देणारे पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून कायमचे वंचित राहण्याची शक्यता आहे.​VK-KYC पूर्ण करण्याचे आवाहन अनेक शेतकऱ्यांची माहिती जमा असूनही केवळ ‘केवायसी’ (KYC) प्रलंबित असल्यामुळे मदत रखडली आहे. अशा शेतकऱ्यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपली ‘VK-KYC’ प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.​

तहसीलदारांचे आवाहन

“सर्व शेतकरी बांधवांनी या आवाहनाची गांभीर्याने नोंद घ्यावी. ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही किंवा ज्यांची कागदपत्रे प्रलंबित आहेत, त्यांनी विहित मुदतीत माहिती सादर करावी. मुदतीनंतर प्राप्त होणारी कोणतीही नावे स्वीकारली जाणार नाहीत.”— अजित दिवटे, तहसीलदार, सिंदखेडराजा.

You may have missed

error: Content is protected !!