बुलढाण्यात रक्ताचं नातं रक्ताळलं! धाकट्या भावाची हत्या करून मृतदेह शेतात जाळला; आरोपी भावासह मित्र जेरबंद….
बुलढाणा/खामगाव (बुलढाणा माझा न्युज )नाती जेव्हा वैरी होतात, तेव्हा क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या जातात, याचाच प्रत्यय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आला आहे. राहुड गावातील एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या मदतीने पोटच्या धाकट्या भावाची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चक्क स्वतःच्याच शेतात जाळून टाकला. मात्र, पोलिसांनी अत्यंत चातुर्याने तपास करत अवघ्या काही तासांत आरोपी भावाच्या मुसक्या आवळल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन संजय इंगळे (३५) याचे त्याच्या धाकट्या भावासोबत काही कारणावरून वाद झाले होते. या वादाचे रूपांतर टोकाच्या रागात झाले. दुपारी दीडच्या सुमारास चेतनने त्याच्या एका मित्राच्या मदतीने धाकट्या भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जबर प्रहार केला. या हल्ल्यात भावाचा जागीच मृत्यू झाला.हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी चेतनने मित्राच्या मदतीने मृतदेह त्यांच्याच शेतात नेला आणि तिथे तो जाळला. शेतात जळालेला मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच परिसरात खळबळ उडाली. पिंपळगाव राजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली.सुरुवातीला संशयावरून पोलिसांनी मृताचा मोठा भाऊ चेतन याची चौकशी केली. पोलिसांनी आपला हिसका दाखवताच चेतन पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने भावाची हत्या करून मृतदेह जाळल्याची कबुली दिली.
