पळसखेड चक्का येथे ‘महाजल’ योजनेचा बोजवारा; ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीलाखो रुपयांचा निधी खर्चूनही नळाला कोरड; संतप्त महिलांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘महाजल’ योजनेचे अक्षरशः ‘तीन तेरा’ वाजले आहेत. या योजनेवर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही ग्रामस्थांना थेंबभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रशासकीय अनास्था आणि देखभालीच्या अभावामुळे ही योजना पूर्णपणे कोलमडली असून, संतप्त ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा पवित्रा घेतला आहे.पळसखेड चक्का गावातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटावा, या उद्देशाने महाजल योजना कार्यान्वित करण्यात आली होती. यामध्ये पाइपलाइन, साठवणूक टाकी आणि विद्युत मोटारींची व्यवस्था करण्यात आली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेतून होणारा पाणीपुरवठा ठप्प आहे. पाइपलाइनची गळती आणि यंत्रणेच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.महिलांचे हंडाभर पाण्यासाठी हालउन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. गावातील नळांना पाणी येत नसल्याने महिलांना पहाटेपासूनच विहिरी, खासगी बोअरवेल आणि शेतशिवारात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घरकाम सोडून पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.प्रशासनाची उदासीनताया गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, लेखी निवेदने दिली; मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. योजनेच्या दुरुस्तीसाठी तांत्रिक अडथळे असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोपही होत आहे.
