महिलांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून समाजविकासात योगदान द्यावे – प्रा. अश्विनी जाधव मेहेत्रे
सिंदखेडराजा( अनिल दराडे ): आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जायंट्स वेलफेअर फाउंडेशनद्वारा संचलित जायंट्स सहेली ग्रुप, देऊळगावराजा यांच्या वतीने “महिलांची नवी जिद्द – डिजिटल भारताकडे” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सिव्हिल कॉलनीतील श्री गणपती मंदिर परिसरात पार पडला.यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना प्रा. अश्विनी जाधव मेहेत्रे यांनी सांगितले की, महिलांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या विकासासाठीही सक्रिय योगदान द्यावे. राष्ट्रनिर्मितीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून विकसित भारत घडविण्यात महिलांची भूमिका निर्णायक असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय, याचे सोप्या उदाहरणांसह स्पष्टीकरण देत त्यांनी दैनंदिन जीवन, शिक्षण, शेती, आरोग्य आणि व्यवसाय क्षेत्रात एआयचा उपयोग कसा करता येतो याबाबत माहिती दिली. डिजिटल युगात महिलांनी तंत्रज्ञान आत्मसात करून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन त्यांनी केले. एआय आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्यास महिलांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात डॉ. प्रियांका देशमुख यांनी सोशल मीडियाचे फायदे व तोटे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की सोशल मीडियामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तींशी त्वरित संपर्क साधता येतो. माहिती व शिक्षणाची देवाणघेवाण सुलभ झाली असून व्यवसाय, मार्केटिंग आणि कला-कौशल्य सादर करण्यासाठीही सोशल मीडिया उपयुक्त ठरतो. यामुळे सोशल मीडिया मॅनेजर, डिजिटल मार्केटर, इन्फ्लुएन्सर अशा नव्या रोजगार संधीही निर्माण झाल्या आहेत.मात्र सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. तुलना, ट्रोलिंग, लाईक्सची अपेक्षा यामुळे नैराश्य आणि चिंता वाढू शकते. तसेच फेक न्यूज, सायबर बुलिंग, गोपनीयतेचा अभाव आणि वेळेचा अपव्यय यासारखे तोटेही आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा मर्यादित व जबाबदारीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता व्यक्त करत अधिक माहिती जाणून घेण्याची तयारी दर्शवली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुपच्या अध्यक्षा किरण अंबुस्कर, तसेच लता हरकूट, राखी काबरा, जया जैन, सविता पाटील, मालती कायंदे, शशी भाला, ज्योती आगेवाल, तरुणा भारुका, सुनीता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
