किनगाव राजा पोलीस ठाण्यात महिलांचा सन्मान!पोलीस प्रशासनाला कायम सहकार्य करणाऱ्या महिलांचा ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या हस्ते सत्कार

IMG-20260309-WA0049

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या वतीने समाजकार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या तसेच पोलीस प्रशासनाला विविध प्रसंगी सहकार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले असून परिसरात सकारात्मक संदेश देण्यात आला.किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात काही महिला सातत्याने पोलीस प्रशासनाला सहकार्य करत असतात. त्यांच्या या मोलाच्या योगदानाची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सुनीता राजोते ,प्रतिभा राजे जाधव ,राधाबाई काकड ,सविता हरकळ यांच्या सह पोलिस विभागातील हेड कॉन्स्टेबल सोनल चव्हाण ,226 ज्योती ननवरे होमगार्ड मधील मनिषा साबळे ,पूजा कदम , अनुराधा त्तौर हर्षदा म्हस्के इत्यादी महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात आला.या प्रसंगी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या हस्ते महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग वाढणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.यावेळी बोलताना ठाणेदार संजय मातोंडकर यांनी सांगितले की, समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असते. अनेक महिला विविध प्रसंगी पोलीस प्रशासनाला मदत करत असून त्यांचे हे योगदान कौतुकास्पद आहे. अशा महिलांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले. महिलांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!