संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; चिखलीत आंबेडकरी समाज आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन
चिखली ( बुलढाणा माझा न्युज ):महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ॲट्रॉसिटी कायद्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शिरसाट यांनी या कायद्यातील अटकेच्या तरतुदीबाबत केलेल्या विधानामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात संतापाची लाट पसरली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात आज चिखली येथे संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे विधान केले होते. तसेच, ‘तपास अधिकाऱ्याची खात्री पटल्याशिवाय आरोपीला अटक होणार नाही’ असा बदल सरकारने केल्याचे त्यांनी सभागृहात जाहीर केले. शिरसाट यांच्या या विधानामुळे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कायद्याची धार कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, ॲट्रॉसिटी कायदा हा केंद्र सरकारने तयार केला असून त्यात फेरबदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाच प्रयत्न केला होता, मात्र केंद्र सरकारने संसदेत सुधारणा करून कलम १८ (ए) समाविष्ट केले आहे. या कलमानुसार, ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची किंवा प्राथमिक चौकशीची गरज नाही. असे असतानाही शिरसाट यांनी केलेले विधान हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आणि संसदेच्या अधिकाराची अवहेलना करणारे आहे.संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री नसून ‘सामाजिक अन्याय मंत्री’ झाल्यासारखे वागत आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे मागासवर्गीय समाजाची थट्टा आहे,” अशा शब्दांत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला.प्रमुख मागण्या:१. संजय शिरसाट यांनी आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन जाहीर माफी मागावी.२. त्यांची सामाजिक न्याय मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी अम्रपाल वाघमारे, योगेश खरात, श्रावण शिंगणे, विशाल जाधव, आकाश जाधव, अमोल इंगळे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
